सांगली : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापूरामुळं झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. सांगलीत अतिवृष्टी आणि महापुरामुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झालं आहे. दौऱ्यातील पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भिलवडी गावाची पाहणी केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधला. अवघ्या 5 ते 7 मिनिटांत मुख्यमंत्र्यांनी हा दौरा आटोपला. अनेकांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनंही दिली. 


भिलवडी येथे नागरिकांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवर्जुन सांगितलं की, सरकार सर्वोतोपरी मदत करेल, पण वेळप्रसंगी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. तसेच त्या निर्णयांसाठी तुम्ही आम्हाला साथ द्याल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. जर पुनर्वसन करायचं असेल तर काही जणांचा विरोध होण्याचीही शक्यता आहे. दरवर्षी पूर येतो, दरवर्षी नुकसान होतं. चार महिने विस्थापितांचं जगणं जगावं लागतं. हे सगळं कुठेतरी थांबवायचं असेल, तर पुनर्वसनाचा विचार करावा लागेल, असंही त्यांनी सांगितलं. 


मुख्यमंत्री बोलताना म्हणाले की, "अनेकांचे संसार उद्ध्वस्त कोरोनामुळे झाले आहेत. अतिवृष्टीचा अंदाज आला त्याच क्षणापासून प्रशासनानं काम सुरु केले. सांगलीच्या या भागांत 4 लाख लोकांचं स्थलांतर केलं. प्राधान्यक्रम जीवितहानी न होण्याला आहे. मला विश्वजित कदम यांनी पूर कुठपर्यंत वाढला होता ते दाखवले. लोकांचे आर्थिक आणि शेतीचे नुकसान झाले आहे. मी तळीये, चिपळूण, कोल्हापूर याठिकाणी पूरग्रस्त भागाचा दौरा केला आहे. नुकसान पाहिले आहे. तुमच्या सर्वांच्या साथीने मी मार्ग काढणारच." पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "आपल्याला नम्र विनंती आहे की, किती नुकसान झाले आहे, त्याचे सगळी आकडेवारी मिळत आहे. शेती, घरदार एकूणच किती नुकसान झाले याचा अंदाज घेणं सुरु आहे."


"काही ठिकाणी कायमस्वरूपी तोडगा काढावा लागेल. कटू निर्णय घ्यावे लागतील, आपली त्याला तयारी हवी कारण दरवर्षी हे पुंरचे संकट येणार आणि आपण त्यातून उभे राहणार की, परत दुसऱ्या वर्षी तेच. दरवर्षी पाण्याच्या पातळ्या मोजण्यात आयुष्य घालवायचे नाही. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार म्हणून जे आपल्या हिताचे आहे ते करणार, असं काही झालं की, लगेच पॅकेज जाहीर केलं जातं. मग त्यातला पैसा कुठे जातो ते कळत नाही. मला प्रामाणिकपणे आपल्यासाठी काम करायचं आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपल्या सूचनांचा नक्की विचार करू.", असं अश्वासनही मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांशी बोलताना दिलं आहे.


कसा असेल मुख्यमंत्र्यांचा सांगली दौरा?


सकाळी 9.50 वा. मुंबईहून कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. 


सकाळी 10.55 वा. भिलवडी, ता-पलूस येथे मोटारीने आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी व नागरिकांशी संवाद. 


सकाळी 11.10 वा. अंकलखोप, ता-पलूस येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी व नागरिकांशी संवाद. 


सकाळी 11.55 वा. कसबे डिग्रज येथे आगमन  व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी. 


दुपारी 12.10 वा. मौजे डिग्रज,  येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी. 


दुपारी 12.30 वा. आयर्विन पुल,  येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी. 


दुपारी 12.45 वा. हरभट रोड, सांगली येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी. 


दुपारी 1 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे आगमन व जिल्ह्यातील पूरपरिस्थितीबाबत आढावा बैठक व पत्रकार परिषद. 


दुपारी 1.50 वा. भारती विद्यापीठ, भारती मेडकल कॉलेज कॅम्पस येथे आगमन व राखीव. दुपारी 3.35 वा. विमानाने मुंबईकडे प्रयाण.