सांगली : संगणकीकरणामुळे दिवसेंदिवस सरकारी नोकऱ्या कमी होत चालल्या आहेत. त्यामुळे सरकारी नोकरीचे खूळ डोक्यातून काढून टाकले पाहिजे. सरकारी नोकरी लागतेच कशाला? असा सवाल करत तरुणांनी स्वतः रोजगार निर्माण केला पाहिजे असं मत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. ते आज सांगलीमध्ये  महापालिकेच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्यात बोलत होते.


सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्यावतीने दीनदयाळ अंत्योदय योजने अंतर्गत मोफत नोकरी, कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार मेळावा आज आयोजित करण्यात आला होता. या रोजगार मेळाव्याचा समारोप राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला.

याप्रसंगी बोलताना महसूल मंत्री  पाटील यांनी तरुण-तरुणींनी सरकारी नोकरी ही कल्पना डोक्यातून काढून टाकली पाहिजे.  वाढत्या लोकसंख्येमुळे सरकारी नोकऱ्या मिळणे कठीण आहे, असंही त्यांनी म्हटले. त्याचबरोबर तरुणांनी येतात खाजगी नोकऱ्यांकडे वळले पाहिजे. खाजगी क्षेत्रातील कायद्यामुळे आता नोकरदाराला कामावरून काढणे सोपे राहिले नाही. त्यामुळे खाजगी नोकरी केली पाहिजे आणि यातून मिळणाऱ्या पैशांतून बचत करून गुंतवणूक केल्यास सरकारी नोकरीपेक्षा फायदाचे ठरेल, असंही ते म्हणाले.

आज गुंतवणूकीसाठी सरकारकडून अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे सरकारी नोकरी लागते कशाला? असा सवाल मंत्री पाटील यांनी उपस्थित केला.