जळगाव : लॉकडाऊन काळात मद्याच्या साठ्यामध्ये मोठी तफावत आढळून आल्याने भाजप आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी आणि माजी महापौर सीमा भोळे यांच्या नावावर असलेल्या पोलन पेठेतील नीलम वाईनचा परवाना गुरुवारी (7 मे) रद्द करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी ही कारवाई केली असून त्याबाबत दुजोराही दिलेला आहे. दरम्यान, आणखी काही परवाने रद्द होऊ शकतात, असे संकेतही जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळाले आहेत.


सुरेश भोळे हे जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार आहेत. तर त्यांच्या पत्नी सीमा भोळे या माजी महापौर आणि जळगाव महापालिकेत भाजपच्या विद्यमान नगरसेविका आहेत.


राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या आठवड्यात आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे यांच्या नावावर असलेल्या नवी पेठेतील नीलम वाईन्स, मुलगा विशाल सुरेश भोळे यांच्या नावावर असलेले नशिराबाद येथील रामा ट्रेडर्स, त्याशिवाय नोतवाणी यांचे नशिराबादचे विजय सेल्स, गुजराल पेट्रोल पंपाजवळील एन.एन.वाईन्स, बांभोरी येथील विनोद वाईन्स आणि नंदू आडवाणी यांच्या मालकीचे पाळधी येथील सोनी ट्रेडर्स या सहा दुकानांची तपासणी केली होती. त्यात या सहाही दुकानांमधील मद्यसाठ्यात तफावत आढळून आली होती आणि रेकॉर्डही अद्ययावत नव्हते. याबाबत अधीक्षक नितीन धार्मिक यांनी सर्व दुकानांवर विसंगतीचे गुन्हे नोंदवून पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला होता.


राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर सचिव अ‍ॅड.कुणाल पवार आणि युवक अध्यक्ष स्वप्नील नेमाडे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री दिलीप वळसे पाटील, आयुक्त कांतीलाल उमाप तसेच विभागीय आयुक्त अ.ना.ओहोळ यांच्याकडे ईमेलद्वारे लेखी तक्रार केली. त्यानंतर या दुकानांची तपासणी झाली होती.


सीमा भोळे यांच्या नावे असलेल्या नीलम वाइनच्या दुकानात अटी व शर्तींचा भंग केल्याचे आढळून आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत काढलेल्या आदेशात नमूद केले आहे. तसेच देशी दारुचे तेरा खंबे, 12532 कॉर्टर, 90 मिलीच्या 1 हजार 777 बॉटल अशा एकूण पंधरा हजार 399 बाटल्या कमी आढळून आल्या. तर साडेसहाशे आणि पाचशे मिलीच्या विविध ब्रँडच्या 4030 बियरच्या बाटल्यामधील तफावत आढळून आली. यासोबतच 255 बिअरच्या बाटल्या कालबाह्य झालेल्या असल्याचेही या पाहणीमध्ये आढळून आले. तर विविध ब्रँडच्या विदेशी मद्याच्या 90, 180, 375, 750, 1000 मिलिटरीच्या 16570 बाटल्या कमी आढळून आल्या असून वाईनच्या देखील 954 बाटल्या कमी दिसून आल्या आहेत.


यानंतर सीमा भोळे यांच्या दुकानात 20 मार्च रोजी असलेल्या मद्यसाठ्यापेक्षा कमी मद्यसाठा आढळून आला. देशी, विदेश मद्याच्या हजारो बाटल्यांमध्ये तफावत असल्याचं समोर आलं. 20 मार्चपासून ते लॉकडाऊनच्या कालावधीत भोळे यांच्या दुकानातून देशी, विदेशी दारुची विक्री झाल्याचा निष्कर्ष जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी काढला. त्यानुसार त्यांच्या दुकानाचा परवाना कायमस्वरुपी रद्द करत असल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.