धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावर माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार पाहायला मिळाला. पोह्यांनी भरलेला ट्रक
उलटल्यानंतर बघ्यांनी जखमींना मदत करण्याऐवजी ट्रकमधील पोह्यांची पोती लंपास केली आहेत. या प्रकारानंतर माणसातली संवेदनशीलता लोप पावत चालली आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.


मुंबई-आग्रा हायवेवर सोमवारी रात्री साडेसात ते साडेआठच्या दरम्यान हा अपघात झाला. मध्य प्रदेशातील डबरा येथून डोंबिवलीकडे 493 गोण्यांमध्ये पोहे भरलेला ट्रक निघाला होता. धुळ्याजवळील बिलाडी फाट्यावर एका कारचालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक विरुद्ध दिशेला जाऊन उलटला.

अपघातात ट्रक चालक आणि क्लीनर किरकोळ जखमी झाले, त्याचप्रमाणे ट्रकमधील पोह्याची पोतीही रस्त्यावर विखुरली. मात्र परिसरातील नागरिकांनी जखमी चालक आणि क्लीनरला रुग्णालयात दाखल करण्याऐवजी पोहे लंपास करण्यात धन्यता मानली.

विशेष म्हणजे चालकानं विरोध केल्यावर लोकांनी जखमी चालकाला मारहाण केल्याची माहिती आहे. पोलिस घटनास्थळी दाखल होताच अंधाराचा फायदा घेत सर्व जण पसार झाले. कारमधील प्रवाशांनीही अपघातानंतर कार जागीच सोडून पोबारा केला. मात्र कार पोलिस स्टेशनमध्ये जमा करण्यात आली आहे.