Dhule News Update : राज्य परिवहन महामंडळाच्या बस पूर्णपणे निकामी झाल्याचे दिसून येत आहे. याचा प्रत्यय आज धुळे बस आगारामधून सुटणाऱ्या धुळे-शिरपूर एसटी बसमुळे आला. ही बस देवपूर परिसरातील उर्दू हायस्कूल समोरच बंद पडली. बंद पडलेल्या या बसला चिमुकल्या विद्यार्थ्यांनी धक्का देऊन सुरू करण्याची वेळ आली.
गेल्या काही दिवसांपासून परिवहन महामंडळातील बसेसची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाल्याचे चित्र समोर येत आहे. बसेसमध्ये अनेक तांत्रिक अडचणी देखील निर्माण होत आहेत. यामुळे प्रवाशांना अनेक वेळा त्रास सहन करावा लागतो. याचाच प्रत्यय आज धुळ्यामध्ये आलाय.
धुळे बस स्थानकातून निघालेली एक बस काही तांत्रिक कारणामुळे बंद पडली. मात्र ही बस सुरू होत नसल्याने थेट प्रवाशांच्या मदतीने धक्का मारत ही बस सुरू करण्याची वेळ प्रवाशांवर आली. यात काही चिमुकल्यांचा देखील समावेश होता. हे चित्र पाहून नागरिकांमधून रोष व्यक्त होत होता. परिवहन महामंडळाच्या बसेसची दुरुस्ती करण्याची आवश्यकता असताना दुसरीकडे मात्र याकडे आगर प्रमुखासहस अधिकारी देखील दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय.
धुळे जिल्ह्यातील बसेसच्या झालेल्या दुरावस्थेबाबत अनेक वेळा वृत्त प्रसारित करून देखील धुळे बस आगर प्रमुखांनी अद्यापही दखल घेतलेली नाही. यामुळे एकीकडे मोठ्या प्रमाणावर भाडे वाढ होत असताना दुसरीकडे परिवहन महामंडळाने प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन बसेसची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.
बस बंद पडल्यानंतर त्या ठिकाणी धुळे आगारातील बसेसची दुरुस्ती करणारे कर्मचारी तात्काळ पोहोचणे अपेक्षित होते. परंतु, ते न पोहोचल्याने चिमुकल्यांवर बसला धक्का देण्याची वेळ आली. ज्या उर्दू शाळेसमोर ही बस बंद पडली त्याच उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांच्या मदतीने आणि बसमधील काही प्रवाशांच्या मदतीने बसला धक्का मारण्यात आला. मात्र, चिमुकल्यांकडून बसला धक्का देत असल्याचे चित्र पाहून यावेळी नागरिकांमधून रोष व्यक्त झाला.
दरम्यान, बस बिघाडाच्या सततच्या घटनांमुळे विद्यार्थी आणि सतत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे महामंडळाने या बस दुरूस्त करून घ्याव्यात अशी मागणी नागरिसांकस विद्यार्थ्यांनी देखील केलीय.
महत्वाच्या बातम्या