धुळे : उपचाराला उशिर झाल्याचं कारण देत धुळे जिल्हा रुग्णालयातील एका डॉक्टरला रुग्णांच्या नातेवाईकांनी मारहाण केली आहे. मारहाणीत डॉ. रोहन मामुनकर यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरचीही तोडफोड करण्यात आली आहे.
योग्य वेळी उपचार न झाल्यामुळे रुग्ण दगावल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या प्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना 15 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शत्रुघ्न शिवाजी लष्कर हा 20 वर्षांचा तरुण दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाला होता. मात्र त्याच्यावर उपचार करण्यास दिरंगाई केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. संतापलेल्या नातेवाईकांनी डॉक्टर रोहन मामुनकर यांना जबर मारहाण केली, तसंच ऑपरेशन थिएटरचीही तोडफोड केली.
शासकीय कामात अडथळा आणणं, दहशत माजवणं, जमावबंदी आदेशाचं उल्लंघन करणं, डॉक्टरांवर हल्ला प्रतिबंधक कायद्याअंतर्गत 20 ते 25 जणांविरोधात धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.