कोल्हापूर : कोल्हापुरात कधी कुठल्या गोष्टीवरून राडा होईल हे सांगता येत नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड याठिकाणी महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्माचे चाहते आमने-सामने आले. त्यातूनच एकाला उसाच्या मळ्यात नेऊन चोप दिल्याची घटना समोर आली आहे.


महेंद्रसिंग धोनी यांनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड याठिकाणी माहीच्या कौतुकाचे होर्डिंग्ज त्याच्या चाहत्यांकडून लावण्यात आले. त्यानंतर लगेच रोहित शर्माला खेल रत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर रोहितच्या चाहत्यांनी देखील कुरुंदवाड शहरात अभिनंदनाचे होर्डिंग लावले. या दोन्ही खेळाडूंच्या चाहत्यांमध्ये आतल्या आत टशन सुरू झालं.


रोहित शर्माच्या अभिनंदनाचे लावलेल्या होर्डिंग्जची अज्ञाताने फाडाफाडी केली. त्यामुळे या चाहत्यांच्या गटातील धुसफूस आणखी वाढली. होर्डींग्ज फाडाफाडी केल्याचा कारणावरून रोहित शर्माचा फॅन असलेल्या तरुणाने राग व्यक्त करत शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यानंतर शिवीगाळ करणाऱ्या चाहत्याला उसाच्या मळ्यात नेऊन चोप दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.


आयपीएल मालिकेत भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू वेगवेगळ्या टीम मधून खेळत असतात. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांचे देखील गट पडायला सुरुवात होते.त्याचाच प्रत्यय कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड या ठिकाणी पाहायला मिळाला. आगामी काळात होणाऱ्या आयपीएल मालिकेदरम्यान अशाच पद्धतीचे चाहत्यांचे गट-तट सर्वत्र पाहायला मिळतील.त्यामुळे पोलिसांनी वेळीच कारवाई करणे गरजेचे आहे. या संदर्भात मारहाणीची अजून तक्रार आली नाही. मात्र संबधित होर्डिंग्ज पालिकेला सांगून काढण्यात आली असल्याची माहिती कुरुंदवाडचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरवडे यांनी दिली आहे.


संबंधित बातम्या :



Khel Ratna Award 2020 : 'हिटमॅन' रोहित शर्मासह पाच खेळाडूंना राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार