उस्मानाबादच्या उमरगा तालुक्यात पाच दिवसांपासून पाऊस पडतोय. गेल्या पंधरा वर्षात उमरगा तालुक्यात असा पाऊस झाला नव्हता. ओढे-नदी-नाले-छोटे-मोठे तलाव भरुन गेले आहेत.त्रिकोळी आणि बेटजवळगा या दोन्ही गावातल्या बंद पडलेल्या बोअरवेलमधून आपोआप पाणी वाहू लागलं.
नाईचाकूर तलाव भरुन ओव्हरफ्लो झाल्यावर लातूर-उमरगा रोडवर पाणी आले. अशा पुरात सावित्रीच्या दुर्घटनेनंतरही शहाणपण न शिकलेल्या बस चालकांनी वाहने घातली.
शेतकऱ्यांनीच तलावाचा सांडवा फोडून पाण्याला वाट करुन दिल्यावर रस्ता वाहतून सुरळीत झाली. उमरगा शहरात आज सकाळपर्यंत पाऊस सुरु होता. मुंबई-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गवर पाणीच पाणी होतं. सखल भागातल्या रुग्णालयात, कॉलेज प्रांगणात पाणी शिरलं.
नारंगवाडी,त्रिकोळी गावातल्या घरांचं पावासाने नुकसान केलं. शेकडो एकर शिवार पाण्याखाली गेलं. सोयाबीनच्या पिकांची या पावसाने माती केली. फक्त 72 तासात तीन वर्षांचा दुष्काळ धुवून काढण्याची किमया या पावसाने केली. आता रबीची चिंता मिटली. वर्षभर पाणीटंचाई होणार नाही. गेले पाच दिवस कोकणात असते तशी झड लागल्याने अतिपावसाला लोक वैतागून गेले आहेत.