बीड : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यांमध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे पोहचले, मात्र गेटवरच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक संपत पाळवदे यांनी धनंजय मुंडेंना रोखलं.

सुरुवातीला पाळवदे यांनी कारखान्यांमध्ये तुम्हाला जाता येणार नाही, असा पवित्रा घेतला. मात्र धनंजय मुंडे यांनी मी कारखान्याचा सभासद असल्यामुळे मला इथं येण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं सांगितलं. जवळपास दहा मिनिटांच्या बाचाबाचीनंतर धनंजय मुंडे यांना कारखान्यात सोडण्यात आलं.

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात गरम उसाच्या रसाची टाकी फुटून मृत्युमुखी पडलेल्या कामगारांचा आकडा 5 वर पोहचला आहे, तर चौघांवर उपचार सुरु आहेत. त्या सर्वांची प्रकृती चिंताजनक आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा हा कारखाना आहे.

वैद्यनाथ कारखाना दुर्घटना, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी सहा लाखांची मदत


ही दुर्घटना घडण्यामागे मानवी चूक असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. एकूणच या दुर्घटनेचा तपास लपवण्यासाठी कारखान्याकडून पोलिसांचा वापर केला जात आहे का, असा प्रश्नसुद्धा धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.

मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना कारखान्यातर्फे तीन लाख, मुख्यमंत्री सहायता निधीतून दोन लाख रुपये आणि कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांच्या वतीने वैयक्तिक एक लाख, असे एकूण सहा लाख रुपये आणि जखमींना दीड लाख रुपये मदत देण्याची घोषणा पंकजा मुंडे यांनी केली. मृताच्या कुटुंबातील एका व्यक्तीला कारखान्याच्या सेवेत सामावून घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

काल सकाळी गौतम घुमरे आणि दुपारी सुनील भंडारे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर मधुकर पंढरीनाथ आदनाक आणि सुभाष गोपीनाथ कराड यांनीही त्यानंतर प्राण गमावले.