बीड : पराभवामुळे कुणी राजीनामा द्यावा की न द्यावा, हा त्याचा प्रश्न आहे. सत्ता,पैसा असूनही पराभव का झाला,याचं आत्मचिंतन करावं, असं म्हणत विधान सभेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी त्यांच्या बहिण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंवर पुन्हा एकदा बोचरी टीका केली आहे.
परळी मतदार संघात धनंजय मुंडे यांनी सर्व जिल्हा परिषद गटात बाजी मारल्याने पंकजा मुंडे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. पराभवाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी हा निर्णय घेतला.
काही दिवसांपूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीतही पंकजा मुंडेंवर धनंजय मुंडेंनी सरशी करत परळी नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेचा पराभव पंकजांच्या जिवावर लागला.
सगळं काही करुनही जनतेने असा कौल का दिला, त्याचं विश्लेषण आत्ता करता येणार नाही. मात्र पराभव स्वीकारुन मी राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सोपवणार असल्याचं पंकजा मुंडेंनी जाहीर केलं आहे.
बीड जिल्ह्यातील एकूण 60 जिल्हा परिषदेच्या जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने 25, तर भाजपने 19 ठिकाणी यश मिळवलं आहे. तर काँग्रेस 3, शिवसंग्राम 4, शिवसेना 4, काकू-नाना आघाडी 3 आणि इतर 2, असा निकाल लागला आहे.