शिक्षण, आरोग्य, आदिवासी, महिला आणि बाल कल्याण खात्यात भ्रष्टाचार झाला, मात्र मुख्यमंत्री क्लीन चिट देत आहेत, असा आरोप धनंजय मुंडेंनी केला.
"ज्या सभागृहात कायदे तयार होतात,
त्या कायदेमंडळात मी भ्रष्टाचाराचे पुरावे दिलेत.
हे पुरावे खोटे असतील, तर महाराष्ट्रातील कोणत्याही चौकात मला फाशी द्या,
फाशी घ्यायला मी तयार आहे", असं धनंजय मुंडे म्हणाले.
मात्र पुरावे खरे असल्यास भ्रष्ट मंत्र्यांना एक दिवसही खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही असंही धनंजय मुंडे म्हणाले.
"भ्रष्टाचाराच्या गप्पा मारणाऱ्या या देवेंद्र फडणवीसांनी, सरकारमध्ये आल्यानंतर क्लीन चिट द्यायला सुरुवात केली. तुम खाते रहो, मै संभालता रहूंगा", असं सांगायला सुरुवात केली", असा आरोप मुंडेंनी केला.
तर भाजप नसबंदी करेल
धनंजय मुंडे यांनी नोटाबंदीवरुन भाजपवर टीकास्त्र सोडलं. जनता आता सावध झाली नाही, तर भाजप नसबंदीही करेल, असा घणाघात धनंजय मुंडेंनी केला.
"8 नोव्हेंबरला नोटबंदी केली, त्याचवेळी नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. बहुसंख्य नगरपालिकेत भाजप जिंकलं. त्यावेळी भाजप नेते म्हणाले, हमने नोटबंदी की, तो भी जनता हमारे साथ है. जिल्हा परिषद- पंचाय समितीत तुम्ही (जनता) जर चुकलात, तर नसबंदी निश्चित आहे", असं धनंजय मुंडे म्हणाले.
पंतप्रधानांना मासबंदीच्या निर्णयाचा फायदा निवडणुकीत झाला. तर नोटबंदीनं पालिका जिंकल्या. त्यामुळे आता सावध झाला नाही तर आता नसबंदी करतील,असा इशारा मुंडे यांनी दिला.
जनता रांगेत
नोटबंदीच्या काळात जनता दहा तास रांगेत उभी होती. मात्र एकही काळा पैसेवाला रांगेत दिसला नाही. मोदींनी काळ्या पैसेवाल्यांना बँकांतून घरपोच पैसा बदलून दिला. हा तुमचा अपमान आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.
काँग्रेस-भाजपची फिक्सिंग
धनंजय मुंडे यांनी भाजप आणि काँग्रेसवरही जोरदार टीका केली. काँग्रेस आणि भाजपची फिक्सिंग असल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी मुंडे यांनी मुंबईसह अनेक ठिकाणी काँग्रेस आणि भाजपचं फिक्सिंग असल्याचा आरोप केला. 'काँग्रेस का हाथ भाजप के साथ आणि भाजप का कमल काँग्रेसके हाथ' में, असल्याचं मुंडे म्हणाले.
विरोधी पक्षनेत्यांच्या जिल्ह्यातच कमळाबाईची मदत पंजासाठी घेतल्याचं त्यांनी म्हटलंय. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटलांच्या घराणेशाहीवरही टीका केली.
अच्छे दिनची चेष्टा
यावेळी मुंडे म्हणाले, "माझ्यावरील मोदींच्या सभेचा परिणाम अजूनही जात नाही. लाखोंच्या जनसमुदायला 'अच्छे दिन'चं अमीष दाखवलं, मात्र तीन वर्षात 'अच्छे दिन'ची चेष्टा झाल्याचा आरोप मुंडेंनी केला.
मोदीजी फकीर असल्याचं सांगतात, मात्र आम्ही संसारी आहोत आमची वाट लावणार का, असा सवालही मुंडेंनी केला.