मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 50 दिवस झाले आणि या 50 दिवसांत विरोधकांच्या हिटलिस्टवर आहेत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे. या प्रकरणात तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडसोबतच्या संबंधावरून धनंजय मुंडेवर राजीनाम्यासाठी राजकीय आणि सामाजिक दबाव वाढलेला आहे. एकाकी पडलेल्या मुंडेंच्या मनात नेमकं काय सुरु आहे? त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय दिल्लीत होणार की मुंबईत? ते स्वत: राजीनामा देणार की त्यांचा राजीनामा घेतला जाणार? येत्या काळात बीडचं राजकारण नेमकं कोणत्या वळणावर जाणार? पाहुयात  याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. 


गेल्या 50 दिवसांत विरोधकांनी एकच मागणी लावून धरलीय ती म्हणजे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची. आका वाल्मिक कराडचे नवनवे कारनामे दररोज समोर येतायत आणि अडचण वाढतेय धनंजय मुंडेंची. अशातच मुंडेंनी दिल्ली गाठली. योगायोगानं त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दिल्लीत होते. त्यामुळे मुंडेंच्या राजीनाम्याचा फैसला दिल्लीत होणार अशी चर्चा सुरू झाली.


दिल्लीमध्ये काय झालं?


- धनंजय मुंडे-प्रल्हाद जोशी यांच्यात 30 मिनिटे बैठक झाली.
- ⁠प्रल्हाद जोशी केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्री आहेत. मस्साजोगमुळे चर्चेत आलेली आवादा कंपनीही याच क्षेत्रात काम करते. 
- ⁠प्रल्हाद जोशी कर्नाटक भाजपमध्ये असताना गोपीनाथ मुंडे कर्नाटक प्रभारी होते.
- ⁠भाजपमधील जुन्या संबंधांचा वापर करून राजीनाम्याची टांगती तलवार टाळण्याचा मुंडे यांचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. 


दिल्लीतील या बैठकीनंतर धनंजय मुंडेंनी राजीनामा देणार नसल्याचं स्पष्ट केलं. उलट आपणच टार्गेट होत असल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मागितला तर राजीनामा देईन असं धनंजय मुंडे म्हणाले.


राजीनामा न देण्यावर ठाम असलेल्या मुंडेंना विरोधक नैतिकतेची आठवून करून देत आहेत आणि आपण दोषी नसल्याचं मुंडे ठासून सांगत आहेत.


धनंजय मुंडे यांचे बॉस अजितदादांनी मात्र मुंडेंच्या राजीनाम्याचा मुद्दा फडणवीसांच्या कोर्टात टोलावल्याचं दिसतंय. मंगळवारी रात्री झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत आमदारांसमोर धनंजय मुंडेंनी त्यांची भूमिका मांडली. पक्ष आणि अजितदादांनी आदेश दिला तर लगेच राजीनामा देईन अशी भूमिकाही त्यांनी घेतली. काही जण वैयक्तिक राग ठेवत आरोप करत असल्याचा आरोप मुंडेंनी बैठकीत केला.  


अंजली दमानियांनी घेतलेल्या भेटीविषयी माहिती अजित पवारांनी पक्षाच्या सगळ्या आमदारांना दिली. अंजली दमानियांनी दिलेली कागदपत्रं मुख्यमंत्र्यांकडे दिल्याचं अजित पवारांनी सांगितलं. 


एकीकडे हे सुरू असताना भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मुंडेंवर घोटाळ्याचा नवा बॉम्ब टाकलाय. 


आता प्रश्न आहे दिल्लीवारी धनंजय मुंडेंचं मंत्रिपद वाचवणार का? मुंडे आणि सरकारवरील दबाव वाढत राहिला तर मुंडेंचा राजीनामा घेतला जाणार का? की नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा देऊन मळभ हटेपर्यंत दूर राहण्याचा धाडसी निर्णय धनंजय मुंडे घेणार? 


ही बातमी वाचा :