नवी दिल्ली : नांदेडमधील काँग्रेसची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केला आहे. ते नवी दिल्लीत एबीपी माझाशी बोलत होते.

“नांदेडमध्ये काँग्रेसला मस्ती चढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ही मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही.”, असे धनंजय मुंडे म्हणाले.

“राष्ट्रवादीचे 10 नगरसेवक असताना, काँग्रेसने आम्हाला केवळ 5 जागा देऊ केल्या. आम्ही 82 पैकी 17 जागांवर लढायला तयार होतो. आता राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार असून, काँग्रेस आणि भाजपला दाखवून देऊ खरी ताकद कुणाची आहे ते.”, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

नांदेड महापालिकेची निवडणूक ऑक्टोबर महिन्यात आहे. म्हणजेच निवडणूक तोंडावर आली असताना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. नांदेड हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला मानला जातो. तिथेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये बिघाडी झाल्याने त्याचा थेट फटका काँग्रेसला बसणार आहे. त्यात धनंजय मुंडेंनी तर काँग्रेसविरोधी आक्रमक भूमिका घेत पराभूत करण्याची एकप्रकारे प्रतिज्ञाच घेतली आहे.

राणेंसंदर्भात धनंजय मुंडे काय म्हणाले?

“नारायण राणे विधानपरिषेदत नसले, तरी विरोधकांची ताकद काही कमी होणार नाही.”, अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते असलेले धनंजय मुंडे म्हणाले. राणेंनी काँग्रेसमधून बाहेर पडत आमदारकीही सोडली आहे. त्यामुळे विधानपरिषदेत सरकारला धारेवर धरण्यासाठी यापुढे राणे विधानपरिषदेत नसतील.