Santosh Deshmukh murder case : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh murder case) याचिकेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली याचिका प्रलंबित ठेवण्याची न्यायालयाला विनंती केली आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणात तपासाला दिशा देण्यासाठी धनंजय देशमुखांची याचिका दाखल केली होती. तपास यंत्रणेला आणखी वेळ द्यावा, असे म्हणत पुढील सुनावणी न घेण्याची त्यांनी विनंती केली आहे. 

Continues below advertisement

29 दिवस झाले तरीही सर्व आरोपींना अटक झालेली नाही 

संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी निघाले आहेत. दरम्यान ते अहिल्यानगर येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी सविस्तर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी जात असल्याचे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे. सोबतच या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये. संतोष देशमुख यांनी सर्व जातीधर्मीयांना बरोबर घेऊन काम केले आहे. या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच सांगितले आहे. मात्र, या प्रकरणाला आज 29 दिवस झालेले आहेत, मात्र तरीही सर्व आरोपी अटक झालेली नाही असे ते म्हणाले. ज्यांनी या सर्व प्रकरणाला मदत केली ज्यांनी कटकारस्थान केले, त्यांना भीती राहिली नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे या सर्व गंभीर प्रकरणावर चर्चा करण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी जात असल्याच देशमुख यांनी सांगितले.

आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी 

दरम्यान, ज्यांनी कुणी हा गुन्हा केलाय त्यांना या प्रकरणाचं गांभीर्यच नाही. त्यामुळं याप्रकरणी फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे धनंजय देशमुख यांनी सांगितले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील ज्या लोकांवर अजूनही संशय आहे. त्या लोकांवर विविध गुन्हे असतानाही पोलीस संरक्षण दिले गेले होते. मात्र आता या प्रकरणाची गृह खात्याने दाखल घेण्याची गरज आहे असंही धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. 

Continues below advertisement