नागपूर : राज्याच्या पोलिस महासंचालकांनी अनाहुत सल्ला देऊन राज्यातील जनतेला धक्का दिला आहे. घरफोडी थांबवण्यासाठी घरात मौल्यवान ऐवज ठेवू नका, असं धक्कादायक आवाहन पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी केलं आहे.

 
पोलिस दलातील कामचुकार आणि बेजबाबदार पोलिस कर्मचाऱ्यांमुळे खाकी वर्दीवरचा विश्वास कमी होत चालला असताना महासंचालकांच्या वक्तव्यामुळे जनतेच्या मनात धास्ती निर्माण होण्याची शक्यता आहे. घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कुणीही घरात सोनं-नाणं किंवा किंमती ऐवज ठेवू नका असं धक्कादायक आवाहन दीक्षित यांनी केलं.

 
नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खरं तर पोलिसांनी जनतेच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण करणं गरजेचं असतं. मात्र घरात किंमत ऐवज न ठेवण्याचा सल्ला  प्रवीण दीक्षितांनी दिला आहे. त्यामुळे जनतेच्या संपत्तीचं संरक्षण करण्यास महाराष्ट्र पोलिस सक्षम नाहीत का, असा सवाल या वक्तव्यानंतर उपस्थित होत आहे.