Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची निराशा आणि हताशा झाली आहे. त्यातूनच नसलेले मुद्दे आणि अनेक कारणांमुळेच ते अशाप्रकारे बोलत आहेत. मात्र, मी मूळचा नागपूरचा (Nagpur) असून अस्सल नागपुरी आहे. मला त्यांच्यापेक्षा खाली जाऊन बोलता येतं. मात्र, मला ते शोभत नाही. कारण, जे मॅच्युअर्ड राजकारणी असतात त्यांनी असे बोलायचं नसतं. आज घडीला मला असं वाटतंय, समोर आपली हार दिसते आहे. दिवसेंदिवस निराशा वाढते आहे आणि त्यातूनच आता शिवराळ भाषा सुरू झाली आहे. मात्र, त्यांनी किती शिवराळ भाषा वापरली तरी जनता त्यांना मतदान करणार नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस आज नागपूर (Nagpur) विमानतळावर आले असता त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.


दक्षिण मुंबईचा निर्णय आधीच झाला होता - देवेंद्र फडणवीस


राज्यातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या लढतीपैकी एक असलेल्या दक्षिण मुंबईचा (South Mumbai Lok Sabha Election) तिढा आता सुटला असून महायुतीकडून शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे आता यामिनी जाधव विरुद्ध अरविंद सावंत असे एकेकाळचे सहकारी आणि सध्या वेगवगेळ्या पक्षात असलेले दोन शिवसैनिक एकमेकांना भिडणार आहेत. याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, दक्षिण मुंबईच्या उमेदवारी संदर्भातील निर्णय आधीच झाला होता. मुंबईमध्ये तीन जागा भारतीय जनता पक्षाने लढायच्या आणि तीन शिवसेनेने लढायच्या, अशा प्रकारचा निर्णय आधीच घेण्यात आला होता. सुरुवातीच्या काळामध्ये याही जागा आम्ही लढाव्या असे आमच्या मनात होतं. त्याकरिता आमच्यातील काही लोक तयारी देखील करत होते. मात्र, काही कारणास्तव आम्ही निर्णय बदलला आणि पंधरा-वीस दिवसा आधीच याबाबत  शिक्कामोर्तब झाला असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणालेय. 


माझ्या पाठीमागे पंतप्रधान मोदी खंबीरपणे उभे आहेत- देवेंद्र फडणवीस


रत्नागिरी-सिंधुदुर्गचे महायुतीचे उमेदवार आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागले असून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना सर्वाधिक त्रास हा उद्धव ठाकरे यांनी दिल्याचा आरोप केला आहे. यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सुरवातीच्या काळात नारायण राणे हे शिवसेना पक्षात होते. तसेच ते बाळासाहेबांच्या सर्वाधिक जवळचे होते. त्यावेळी आम्ही तेथे नव्हतो. मात्र, नारायण राणे जर असे म्हणाले असतील तर त्यांना आलेले अनुभव आणि त्यांच्याकडे असलेली माहितीच्या आधारे ते बोलले असतील, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. आज महाराष्ट्रात जो काही विकास झाला आहे आणि त्यातून महाराष्ट्राने ज्या प्रकारे मला स्वीकारलं, हे सगळे होत असताना माझ्या पाठीमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी कायम अतिशय खंबीरपणे उभे होते. म्हणूनच मी हे करू शकलो असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या