Devendra Fadnavis:  मुंबई केंद्रशासित करा अशी मागणी कर्नाटकच्या (Maharashtra Karnataka Border Dispute)  मंत्र्यांनी केल्यानंतर आज  याचे पडसाद विधानसभेत त्याचे पडसाद  उमटले आहेत.  कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री सी एस अश्वथ नारायण यांच्या निर्णयाचा विधानसभेत निषेध करण्यात आला असून त्यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे.  मुंबई महाराष्ट्राची असून कोणाच्या बापाची नाही, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्र्यांकडे नारायण यांच्या वक्तव्याची तक्रार करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत दिली आहे.

  


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई ही महाराष्ट्राची आहे. मुंबईवर जर कोणी दावा सांगत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही. गृहमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत जे ठरलं आहे त्याचं उल्लंघन वारंवार कर्नाटक सरकारकडू होत आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करत असून आम्ही गृहमंत्र्यांना पत्र लिहित याचा निषेध व्यक्त करणार आहे.  केंद्रीय गृहमंत्री यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून देणार आहे.  मुंबई ही महाराष्ट्राची आहे ती कोणाच्या बापाची नाही. 


अजित पवार यांनी देखील मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्याच्या मागणीचा निषेध केला आहे. तसेच  महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पत्र लिहून याचा निषेध व्यक्त केला पाहिजे, अशी मागणी अजित पवार यांनी विधानसभेत केली आहे.


कर्नाटकचे मंत्री काय म्हणाले होते?


महाराष्ट्राच्या विधिमंडळात सीमाप्रश्नाचा ठराव झाल्यानंतर त्याचे पडसाद बेळगावात सुरु असलेल्या कर्नाटक विधिमंडळात उमटले. मुंबई केंद्रशासित करा अशी मागणी कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री सी एस अश्वथ नारायण (C. N. Ashwath Narayan) यांनी केली. शिवाय मुंबईत वीस टक्के कन्नडिग असल्याचा जावईशोध त्यांनी लावला आहे. बेळगाव केंद्रशासित करायची असेल तर आम्हालाही मुंबई केंद्रशासित करण्याची मागणी करता येते, असं नारायण म्हणाले. 


महाजन आयोगाने केलेल्या शिफारशी महाराष्ट्राने फेटाळल्या आहेत. त्यामुळे आता महाजन आयोगाचाही काही प्रश्न नाही. महाराष्ट्राने दाखल केलेला सर्वोच्च न्यायालयातील खटला टिकणार नाही. प्रश्न सोडवण्याचा अधिकार संसदेला आहे. आम्ही शांतताप्रिय आहोत. आम्ही कधीच महाराष्ट्रातील कन्नड जनतेला फूस लावत नाही. सीमाप्रश्न संपलेला असून याबद्दल चर्चा देखील करु नये, असेही अश्वथ नारायण म्हणाले.


इतर महत्त्वाच्या बातम्या: