मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असून सोमवारी किंवा मंगळवारी त्यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती होईल अशी माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुख्यमंत्री म्हणून ज्या नावाची घोषणा करतील त्याला पाठिंबा असेल असं एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी आधीच जाहीर केलंय. दरम्यान, आझाद मैदानावर 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार आहे.


राज्यातील महायुती सरकार भक्कम पाठबळ मिळवत पुन्हा एकदा सत्तेत आलं आहे. त्यामध्ये भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्याने त्यांच्याकडेच मुख्यमंत्रिपद जाणार हे निश्चित होतं. पण देवेंद्र फडणवीस की आणखी कोण मुख्यमंत्री होणार यावर मात्र स्पष्टता नव्हती. पण आता देवेंद्र फडणवीसांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे. 


 






मुख्यमंत्री ठरला, गृहमंत्री कोण? 


राज्यातील मुख्यमंत्री तर ठरला आहे, पण गृहखातं कुणाकडे जाणार हे मात्र अद्याप स्पष्ट होत नाही. गृह खातं भाजपच कायम ठेवणार की शिंदेंच्या शिवसेनेकडे जाणार या प्रश्नाचं उत्तर सापडत नसल्यानं सरकार स्थापनेचं घोडं अडल्याची सर्वत्र चर्चा आहे. अशातच एकनाथ शिंदेंनी मोठं वक्तव्य केलंय. गृह खात्यासंदर्भात महायुतीमध्ये चर्चा सुरू असल्याचं एकनाथ शिंदे म्हणालेत. त्यामुळे गृहखात्याचा प्रश्न अजून तरी निकाली निघाला नसल्याचं कळतंय. 


शिवसेनेच्या नेत्यांनी गृहमंत्रिपदाचा आग्रह अनेकवेळा बोलून दाखवलाय. शिंदेंच्या आजच्या भूमिकेमुळे त्यावर शिक्कामोर्तब झालंय असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. दरम्यान एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर दरे गावातून ठाण्यात परतले आहेत. त्यामुळे महायुतीची रखडलेली बैठक लवकरच होण्याची शक्यता आहे. ज्यात मुख्यमंत्री कोण होणार इथपासून अनेक प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा आहे.


श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्रिपदी?


श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवण्याचा एकनाथ शिंदेंचा विचार आहे का? असा प्रश्न जन्माला घातलाय तो एकनाथ शिंदेंच्याच उत्तरानं. दोन दिवसांची विश्रांती घेऊन काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दरे गावचा निरोप घेतला. त्यापूर्वी पत्रकारांनी एकनाथ शिंदेंशी संवाद साधला. उपमुख्यमंत्रिपदी श्रीकांत शिंदे असतील का असा प्रश्न एकनाथ शिंदेंना विचारण्यात आला. त्यावर चर्चा सुरू असल्याचं एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं. 


दरम्यान, श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्रिपदी बसवण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला तर तो भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मान्य असेल का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तसंच पक्षातील इतर ज्येष्ठ नेत्यांना सोडून उपमुख्यमंत्री बनण्याची संधी एकनाथ शिंदे मुलाला देतील का? हे देखील पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.


ही बातमी वाचा: