नवी दिल्ली : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री उशीरा पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती मिळतेय. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यात राज्यातील विविध विषयांवर चर्चा झाल्याचं कळतंय. काल देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली, त्यानंतर ही भेट झाल्याचं कळतंय.
देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यातील ही भेट राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर असण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सुरु असलेल्या घडामोडींची नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना माहिती दिली असावी. राज्यात यापुढे काय पावलं उचलावी, या राजकीय स्थितीचा फायदा घेता येईल का? याचीही चर्चा झाली असल्याची दाट शक्यता आहे.
सचिन वाझेंच्या ऑपरेटरचा शोध घेणे गरजेचं- फडणवीस
काल देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत मुंबई पोलीस आयुक्तांची बदली, सचिन वाझे प्रकरणावर सरकारवर सडकून टीका केली. मुंबई पोलीस आयुक्तांची तर बदली केली. पण, सचिन वाझे यांना ऑपरेट करणारे सरकारमधील जे आहेत, त्यांचा शोध घेणं गरजेचं आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. तसेच 2018 मध्ये मी मुख्यमंत्री असताना सचिन वाझे यांना सेवेत पुन्हा घेण्यास शिवसेनेचा दबाव होता. परंतु हायकोर्टाच्या आदेशामुळे निलंबित असलेल्या वाझेंना पुन्हा घेण्यास मी नकार दिला, असा दावाही त्यांनी काल केला.
मनसुख हिरण प्रकरणाचा तपासही एनआयएने आपल्याकडे घ्यावा अशी मागणी त्यांनी केली. हे पोलीस दलाचं अपयश नाही तर सरकारचं अपयश आहे. पोलीस आयुक्तांची तर बदली केली. पण, सचिन वाझेंना ऑपरेट करणारे सरकारमधील जे आहेत, त्यांचा शोध घेणं गरजेचं आहे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.