मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली असून त्यामध्ये विधानपरिषदेच्या सभापती निवडीवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच विधानपरिषदेमध्ये राज्यपाल नियुक्त 12 जागा भरण्याबाबत पुढील काळात काय करता येईल याबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे. या अधिवेशनातच सभापती निवड करण्याचा भाजपचा प्रयत्न असून त्यासाठी भाजपकडून राम शिंदे यांच्या नावाचा विचार सुरू आहे. 


राज्यपाल नियुक्त आमदारांचा घोळ तीन वर्षांपासून


विधानपरिषदेत जास्तीत जास्त संख्याबळ करण्यासाठी सर्व रिक्त जागा भरण्याच्या हालचाली महायुतीकडून सुरू आहेत. राज्यातील राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीबाबतचा घोळ गेल्या तीन वर्षाहून अधिक काळापासून असल्याचं दिसून येतंय. 


राज्यात महाविकास आघाडी सरकरा सत्तेत आल्यानंतर त्यांनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना 12 सदस्यांची यादी पाठवली होती. पण राज्यपालांकडून या यादीला ना हिरवा कंदील देण्यात आला, ना यादी मंजूर करण्याबाबत कोणतंही भाष्य करण्यात आलं. या प्रकरणी राज्य सरकारने न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतरही राज्यपालांनी कोणताच निर्णय घेतला नव्हता.


राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीने दिलेल्या 12 सदस्यांची यादी मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शिंदे सरकारकडून नवीन यादी सादर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. 


त्याचवेळी दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही  राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. विधानपरिषदेतील सभापती पद रिक्त आहे. याबाबत लवकरात लवकर निवडणूक जाहीर करावी याबाबत विरोधी पक्ष आग्रही आहेत.


ही बातमी वाचा: