Devendra Fadnavis on Cooperative sugar mills criticism: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर आलेल्या नैसर्गिक आपत्तीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याची ग्वाही दिली. काळजी करू नका आमचं सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभा आहे. भरीव मदतीसाठी राज्य सरकार निर्णय करेल, असे फडणवीस यांनी सांगितले. लोणीमधील शेतकरी मेळाव्यात बोलताना फडणवीस म्हणाले की, कालच अजित दादा मी आणि एकनाथ शिंदे आम्ही सगळे बसलो आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत काय करता येईल या संदर्भात आराखडा तयार करणं सुरू केला आहे. फडणवीस म्हणाले की, आमच्या पाठीशी अमित भाई शाह आहेत. त्यांनी सांगितलं काळजी करू नका काय लागलं ते केंद्र सरकारच्या माध्यमातून देऊ.
एफआरपीतले पैसे हे शेतकऱ्याचे आहेत, नफ्यातले पैसे कारखान्याचे
सहकारी कारखान्यांचे मालक कारखानदार नसून शेतकरी आहेत, असे त्यांनी ठामपणे सांगितले. ते म्हणाले की, अरे तुम्ही मालक नाही आहे या कारखान्याचे मालक आमचा शेतकरी आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहण्याचं काम सरकार करेल. साखर कारखान्यांनी नफ्यातून शेतकऱ्यांसाठी मदत निधी बाजूला काढण्यास नकार दिल्याबद्दल त्यांनी टीका केली. शेतकऱ्यांसाठी बाजूला ठेवण्यास सांगितलेला निधी हा कारखान्याच्या नफ्यातून मागितला होता, तो शेतकऱ्यांच्या एफआरपीतून नव्हे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. एफआरपीतून मागितलं नव्हते, एफआरपीतले पैसे हे शेतकऱ्याचे आहेत, नफ्यातले पैसे कारखान्याचे आहेत, असे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्याला मदत करायला त्यांच्यात दानत नाही
शेतकऱ्यांचा काटा मारून (वजनामध्ये फसवणूक) कारखाने पैसे जमा करतात, पण शेतकऱ्याला मदत करायला त्यांच्यात दानत नाही, असा आरोपही त्यांनी केला. तुम्ही शेतकऱ्याचा काटा मारून मारून पैसा जमा करता आणि शेतकऱ्यांसाठी 25 लाख रुपये द्या म्हटलं तर तुम्हाला देण्याची दानत नाही, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, जे लोक आमच्यावर टीका करत आहेत, त्यांना सांगतो एकदा आरशात बघून घ्या. तुम्ही असताना तुम्ही काय केलं हे एकदा आरशात बघा त्याच्यानंतर आमच्यावर टीका करा. आम्हाला खुर्च्या तोडण्यासाठी लोकांनी पाठवलेलं नाही, शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी पाठवला आहे आणि ते केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. त्यांनी उल्हास खोऱ्यातील 54 टीएमसी पाणी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून नगर, नाशिक आणि मराठवाड्यापर्यंतचा भाग दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला.
सहकार मंत्री म्हणून धडाकेबाज निर्णय घेतले
सहकारातले कार्यकर्ते म्हणून अमित शहा यांनी पहिले सहकार मंत्री म्हणून धडाकेबाज निर्णय घेतले आणि महाराष्ट्राला संस्था बळकट करण्यासाठी 8 ते 10 हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले. एकट्या महाराष्ट्राला वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्या विभागाच्या माध्यमातनं महाराष्ट्रातल्या संस्था बळकट करण्यासाठी 8 ते 10 हजार कोटी रुपये अमित भाईंनी उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या