Bhai Jagtap on Devendra Fadnavis : कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या राजकीय विडंबन कवितेनंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. या वादावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना स्टँडअप कॉमेडियन कामरा यांनी ज्या प्रकारे एकनाथ शिंदे यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे तो चुकीचा आहे. हे आम्ही सहन करणार नाही. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत जनतेने आम्हाला मतदान केले आणि पाठिंबा दिला. गद्दारांना लोकांनी घरी पाठवले आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या जनादेशाचा आणि विचारसरणीचा अपमान करणाऱ्यांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे.


याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणता येणार नाही


फडणवीस पुढे म्हणाले, 'विनोद करायला हरकत नाही, पण मोठ्या नेत्यांची बदनामी आणि अपमान करण्याचा प्रकार अजिबात सहन करता येणार नाही. कोणी आपली खिल्ली उडवू शकते, पण अपमानास्पद विधाने करणे खपवून घेतले जाऊ शकत नाही. कामराने माफी मागावी. मुख्यमंत्री म्हणाले की, राहुल गांधी देखील तेच संविधान पुस्तक दाखवत आहेत जे कामरा पोस्टमध्ये वापरत आहेत. दोघांनीही संविधान वाचलेले नाही. इतरांच्या स्वातंत्र्यावर आणि विचारसरणीवर कोणीही अतिक्रमण करू शकत नाही. याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणता येणार नाही.


देवेंद्र फडणवीसजी तुम्ही संविधानावर जास्त बोलू नका


दरम्यान, संविधानाचा मुद्दा आल्यानंतर काँग्रेस नेते भाई जगताप यांनी फडणवीस यांना टोला लगावला आहे. भाई जगताप म्हणाले की, देवेंद्र फडणवीसजी तुम्ही संविधानावर जास्त बोलू नका, तुम्ही संविधानाप्रमाणे वागता का? आरएसएसने संविधान तयार केलं नाही ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं आहे. हे संविधान बदलायला तुम्ही राज्यात आणि केंद्रात प्रयत्न करत आहात, असे ते म्हणाले. नुसतं डोक्याला संविधान लावल्याने तुम्ही तसे वागणार नाही. त्यामुळे तुम्ही संविधानावर कमी बोला. कुणाल कामरा काही चुकीचं बोलला असेल, तर समर्थन केलं जाणार नाही, पण तो काही बोलला म्हणून त्याचे हॉटेल किंवा त्याचा स्टुडिओ तोडफोड करणे याचा समर्थन केलं जाणार नाही, असे  भाई जगताप यांनी सांगितले. 


पण सगळीकडेच बुलडोजर पॅटर्न वापरायचा का?


नागपूर बुलडोजर कारवाईवर बोलताना ते म्हणाले की, जर अनधिकृत बांधकाम असेल तर बुलडोझर चालवा, पण सगळीकडेच बुलडोजर पॅटर्न वापरायचा का? अशी विचारणा त्यांनी केली. आता मी मंत्री बोलताना ऐकलं की जिथे कुणाल कामरा कार्यक्रम करत होता तिथे सुद्धा अनधिकृत काम आहे. सत्तेचा माज म्हणून जिथे अनधिकृत काम नसेल तिथे सुद्धा बुलडोजर तुम्ही चालवणार का? अशीही विचारणा त्यांनी केली.