Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सत्तास्थापनेवेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटलेच नाहीत असे माहिती अधिकारात समोर आलं आहे. राज्यपालांच्या कार्यालयाने माहिती अधिकारात धांदात खोटे उत्तर दिल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी म्हटलं आहे. राजभवन कार्यालयातून नेमकी कसली लपवाछपवी होत आहे, असा प्रश्नही  त्यांनी उपस्थित केला आहे. 


बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथील नितीन यादव यांनी माहिती अधिकारात उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोणत्या तारखेस राज्यपालांना भेटले याची माहिती मागविली होती. यावर राजभवन कार्यालयाने देवेंद्र फडणवीस यांची राज्यपालांसोबत भेट झाल्याची नोंदच राजभवन दैनंदिन कार्यक्रम पत्रिकेत नसल्याची माहिती राज्यपालांच्या कार्यालयाने दिली. 


राजभवन कार्यालयातून देण्यात आलेली ही माहिती खोटी असल्याचे यादव यांचं म्हणणं आहे. 28 जून 2022 रोजी तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राज्यपाल यांना भेटल्याच्या बातम्या विविध वृत्तपत्रात आणि वृत्त वाहिन्यांवर प्रसिद्ध झाल्या आहेत. असे असतानाही राजभवन कार्यालयाने देवेंद्र फडणवीस भेट नसल्याची माहिती दिल्याने आश्चर्य वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.


नितीन यादव यांनी राज्यपालांनी नवीन सरकार स्थापनेसाठी ज्यांना निमंत्रण दिले होते त्याची माहिती मागितली. त्याशिवाय, एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापनेसाठी राज्यपालांना दिलेले पत्र याची माहिती RTI द्वारे मागितली होती. मात्र, राज्यपाल महोदयांनी अद्यापही त्यांच्याजवळच ही पत्रे वैयक्तिक राखून ठेवली असून त्यांच्याच राजभवन कार्यालयासही उपलब्ध करुन दिली नाहीत. त्यामुळे ही माहिती राज्यपालांनी स्वतःजवळच ठेवण्याची नेमकी त्यांना कशाची भिती आहे असा सवाल नितीन यादव यांनी विचारला आहे. 


तत्कालीन शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेचे 40 आमदार सूरत आणि त्यानंतर गुवाहाटीमध्ये गेले होते. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले होते. त्यानंतर राज्यपालांची भेट घेऊन सरकार अल्पमतात असल्याचा दावा विरोधी पक्षाने केला होता. देवेंद्र फडणवीस यांनी 28 जून 2022 रोजी राज्यपालांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते. त्यानंतर राज्यातील सत्तासंघर्षाची लढाई कोर्टात गेली. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: