मुंबई : राजकीय नेते विरोधात असताना दिलेली आश्वासनं सत्तेत आल्यानंतर विसरतात, हे काही नवीन नाही. हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत घडलंय. फडणवीस विरोधात असताना अत्यंत आक्रमकपणे आघाडी सरकारने केलेल्या लोडशेडिंगविरोधात बोलत होते आणि लोडशेडिंगमुक्तीसाठी भाजपकडे सत्ता देण्याचं आवाहन करत होते. फडणवीसांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


विरोधात असताना फडणवीसांनी काय म्हटलं होतं?

हा व्हिडीओ देवेंद्र फडणवीस विरोधात होते, त्यावेळीचा आहे. फडणवीस त्यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. आता गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रभरात भाजप सरकारने लोडशेडिंग लागू केलं आहे. त्यानंतर फडणवीसांचा हा जुना व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातून फडणवीसांची आश्वासनं किती फोल ठरली आहेत, हे दिसून येते.

व्हिडीओ :



महाराष्ट्रात सध्या विजेची काय स्थिती?

वीजटंचाईमुळे ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह राज्यातील सर्व महानगरांमध्येही तातडीचे लोडशेडिंग सुरु झालं आहे. त्यामुळे ऐन ऑक्टोबर हीटमध्ये लोकांचा चांगलाच फटका बसला आहे. शहरी भागात तीन तास तर ग्रामीण भागात नऊ तासांपर्यंत भारनियमन करण्यात येत आहे. भांडुप, मुलुंड, नवी मुंबई, ठाणे, कळवा, मुंब्रा, दिव्यातही रोज सव्वा तीन ते सात तास वीज लोडशेडिंग लागू करण्यात आलंय. कालपासून हे लोडशेडिंग लागू झालंय.

राज्यात २२०० ते २३०० मेगावॉटचे लोडशेडिंग होत असल्यानं कृषीपंपांच्या वीजेतही दोन तासांची कपात करण्यात आलीय.  लोडशेडिंगचं संकट वाढत आहे. आणि दिवाळीवरही लोडशेडिंगचे सावट आहे. त्यामुळे मिळेल तेवढी महागडी वीज खरेदी करण्यासाठी महावितरचण कंपनीची धावपळ सुरु आहे.

संबंधित बातम्या :

ठाणे, नवी मुंबईसह महानगरांत भारनियमन सुरु

कोळशाचा तुटवडा, राज्यात तब्बल 14 तासांपर्यंत भारनियमन