अहमदनगरमध्ये घरात घुसलेला बिबट्या अखेर जेरबंद
एबीपी माझा वेब टीम | 06 Oct 2017 01:09 PM (IST)
या बिबट्याने काल संध्याकाळी परीगाबाई खर्डे या महिलेच्या अंगावरुन उडी मारत त्यांच्या घरात प्रवेश केला.
अहमदनगर : अहमदनगरच्या राहुरी तालुक्यामधील कोल्हार खुर्द गावातल्या घरात घुसलेल्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात आलं आहे. तब्बल 18 तासांनी बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आलं आहे. या बिबट्याने काल संध्याकाळी परीगाबाई खर्डे या महिलेच्या अंगावरुन उडी मारत त्यांच्या घरात प्रवेश केला. रात्रभर मुक्काम केल्यानंतर बिबट्या दुपारपर्यंत घरातच होता. घरात कुणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. गावकऱ्यांनी त्याला घरातच कोंडून ठेवलं होतं. वनविभागाचे कर्मचारी आणि पोलिस रात्रभर या घराबाहेर पहारा देत होते. सकाळपासून बिबट्याला घराबाहेर काढून त्याला पिंजऱ्यात बंदिस्त करण्याचे प्रयत्न केले जात होते. अखेर दुपारी दोनच्या सुमारास बिबट्याला जेरबंद करण्यात आलं. दरम्यान, या भागात ऊसाचं क्षेत्र अधिक असल्याने इथे बिबट्यांचा वावर जास्त असते. या परिसरात वारंवार अशा घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पाहा व्हिडीओ