नागपूर : नगरपालिका निवडणुकीत जिंकून आले, त्याचा आनंद साजरा करा. मात्र, नगरपालिकेत भ्रष्टाचार किंवा चुकीची कामे केली तर तिथल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांवर कारवाई होईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
“ज्या नगरपालिकेत भ्रष्ट कारभार दिसेल, ती बरखास्त केली जाईल. भाजप तिथल्या भ्रष्ट नेतृत्वासोबत संबंध ठेवणार नाही.” असे मुख्यमंत्री म्हणाले. नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकीत जिंकून आलेल्या नगरसेवक आणि नगराध्यक्षांच्या सत्कार समारंभात बोलत होते.
“जनतेने जुन्यांना हटवून भाजपच्या हातात मोठ्या विश्वासाने सत्ता दिली आहे. ते विश्वास कायम ठेवा. हे मोदींचे पक्ष असून इथे गैरकारभार खपवून घेतले जात नाही.” असे फडणवीस म्हणाले.
“या आधीच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्तेच युतीसाठी आग्रह धरायचे. मात्र, यंदा कार्यकर्त्यांचा युतीसाठी आग्रह नव्हता” असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले.
खऱ्या अर्थाने युती फक्त 5 ठिकाणी झाली होती. त्यामुळे राज्यात इतरत्र भाजपने स्वबळावर निवडणूक जिंकल्याचा दावा दानवे यांनी केला. या सत्कार सोहळ्यात भाजपचे सर्व मंत्री आणि प्रमुख नेते उपस्थित होते.