Manoj Jarange Patil, Antarwali Sarati : मराठा समाजाला सगेसोयरे आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण (Maratha quota activist) लागू करण्याच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीत (Antarwali Sarati) मनोज जरांगे पाच दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. मंगळवारी त्यांची प्रकृती खालावली होती, ग्रामस्थांच्या विनंतीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेतले. पण त्यानंतर आज सकाळी बोलताना तोडगा काढला नाही, तर उपचार घेणार नाही, अशी आपली भूमिका स्पष्ट केली. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  आरक्षणाबाबत सरकार सकारात्म आहे, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते मुंबईत बोलत होते. 


जरांगेंच्या मागण्यावर सरकार कारवाई करत आहे - 


मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे, त्याबाबत सरकार गंभीर आहे. त्यांच्या मागण्यावर सरकार कारवाई करत आहे. मागच्या काळात आम्ही त्यांना जे आश्वासन दिले, केसेस परत घेण्याचे ती प्रक्रिया सुरू आहे. त्यांची मागणी आहे  त्याबाबत देखील सरकारने पहिलं नोटिफिकेशन जारी केलेलं आहे, त्यावर कार्यवाही सुरू आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.  


ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही 


ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही. मी ओबीसी नेत्यांशी चर्चा करत आहे. छगन भुजबळ यांच्याशी देखील चर्चा करून मी त्यांना समजावून सांगणार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं - 


ज्यांच्याकडे कुणबी दाखला आहे, त्यांना सर्टिफिकेट देता येतं. सर्वोच्च न्यायालयाने जे निकष ठरवून दिलेत त्यांनी कशात बसणारच नोटिफिकेशन काढण्यात आलेय. ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही. मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं पाहिजे असे आमचे मत आहे. आरक्षणाबाबत सरकार नेहमीच सकारात्मक राहिलं आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


मंत्र्यावर विश्वास ठेवणं चूक आहे का? मनोज जरांगे यांचा सवाल 


सगे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी पाच महिने झालेत. जर करायचं असल्यास एवढा वेळ थोडाच लागतो. आज संध्याकाळपर्यंत कळेल काय विषय आहे. नाही कळलं तर सलाईन काढून टाकू, एखाद्या मंत्र्यावर विश्वास ठेवणे ही माझी चूक नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. दरम्यान, मराठा आरक्षण तसेच सगे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. 


आणखी वाचा - 


Laxman Hake: अंतरवाली सराटीत आता ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी लढाई, लक्ष्मण हाके प्राणांतिक उपोषणाला बसणार


देवेंद्र फडणवीसांचा विश्वासू आमदार मध्यरात्री जरांगेंच्या भेटीला, फोनवरुन अंतरवाली सराटीतील महिती दिली