कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी पोलीस दलाने अनोखा उपक्रम सुरु केला आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांच्या घरांमध्ये कुणी नाही त्यांना कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यामधून आरोग्याच्या चौकशीसाठी फोन केला जाणार आहे. त्यांच्या आरोग्याची विचारपूस करून आवश्यक असलेली मदत पोलीस दलाकडून केली जाणार आहे. जर संबंधित ज्येष्ठांना आरोग्य विषयी काही मदत हवी असेल तर ती सेवादेखील पोलीस दलाच्या माध्यमातून केली जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना अत्यावश्यक सेवा देखील पोलिसांच्या माध्यमातून दिली जाणार आहे.
लॉकडाऊनच्या काळात ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याच्या अनेक घटना गेल्या वर्षभरामध्ये समोर आल्या आहेत. कुठल्याही ज्येष्ठ नागरिकांचे हाल होऊ नयेत किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी कोल्हापूर पोलिसांनी हे पाऊल उचललं आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना पोलीस अधीक्षक शैलेंद्र बलकवडे यांनी आदेश दिले आहेत, की पोलीस ठाण्यामधून ज्येष्ठ नागरिकांच्या घरांमध्ये दररोज फोन केला पाहिजे, त्यांच्या आरोग्याची किंवा त्यांना कोणत्या गोष्टीची गरज आहे का? या सगळ्याची विचारपूस करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
कोल्हापूर शहरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात सुरुवातीला हा उपक्रम सुरु केला. या उपक्रमाचे कौतुक सर्व स्तरातून होऊ लागले. त्यामुळे केवळ एका पोलीस ठाण्यात पुरता हा उपक्रम न ठेवता संपूर्ण जिल्ह्यातील निराधार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कोल्हापूर पोलीस करत आहेत.
जुना राजवाडा पोलीस ठाण्याचा संदेश
नमस्कार काका / काकू,
मी जुना राजवाडा पोलीस ठाण्यातून आपणांशी संपर्क करीत आहे. आपण कसे आहात? तब्येत कशी आहे? सध्या कोरोनासारख्या संसर्गजन्य रोगामुळे लोक मानसिक तणावात राहत आहेत. नकारात्मक माहिती वारंवार ऐकून, वाचून तणाव येणे साहजिकच आहे... पण कोरोनाचा संसर्ग मास्कचा वापर आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करून टाळता येतो. वेळेत उपचार झाल्यास बरा होतोच त्यामुळे घाबरुन न जाता काळजी घ्यावी बस्स. आपणास कोणत्याही वेळी काही मदत लागल्यास आपणास पोलीस सहकार्य करतील. आपल्यासाठी डॉक्टर, नर्स जीवाची बाजी लावतायत त्याच्या लक्ष्याला आपणही मास्क वापरुन, गर्दी टाळून सहकार्य करुया...