लातूर : काँग्रेस आमदार अमित देशमुखांच्या साखर कारखान्यांमुळेच लातूकरांवर पाणी टंचाईचं भीषण संकट ओढवलं असल्याचा घणाघात महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे. विलासराव देशमुखांच्या गावात असं व्हावं, ही गंभीर बाब असल्याची खंतही एकनाथ खडसेंनी यावेळी व्यक्त केली. सांगली आणि त्यानंतर लातूर दौऱ्यासाठी रवाना झालेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी ही माहिती दिली.


 

मिरज टू लातूर... पाणी एक्स्प्रेस

 

लातूरला रेल्वेनं येणारं पाणी आता उजनीऐवजी मिरजेतून देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. उजनीऐवजी लातूरकरांसाठी मिरजेहून पाणी आणलं जाणार आहे. येत्या 15 दिवसांत दोन ट्रेनच्या माध्यमातून 5 एमएलडी पाणी लातूरकरांसाठी आणणार असल्याचं महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले.

 

उजनीतून पाणी आणण्यास यंत्रणा नाही!

 

आधी लातूरमध्ये उजनीतून रेल्वेच्या माध्यमातून पाणी आणण्याचा निर्णय झाला होता. मात्र, उजनी धरणापासून पंढरपूर रेल्वे स्थनाकापर्यंत पाणी आणण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी राहिली नाही. त्यामुळे अखेर मिरजेतून पाणी आणण्याचा निर्णय घेण्यात आला.