Devendra Fadnavis LIVE in Vidhan Sabha Session : शिंदे-फडणवीस सरकारनं 164 सदस्यांचा पाठिंबा मिळवत विधानसभेतील बहुमत चाचणी जिंकली. विधानसभा अध्यक्ष निवडीपाठोपाठ बहुमत चाचणी जिंकून सरकारनं विरोधी महाविकास आघाडीला धोबीपछाड करत पहिला टप्पा पार केला. शिवसेनेच्या आणखी एका आमदाराला गळाला लावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आणखी एक मोठा धक्का दिला. सकाळी 11 वाजता बहुमत चाचणीसाठी सभागृह सुरु झालं, तेव्हा विरोधी पक्षातले अनेक आमदार सभागृहात पोहोचण्यासाठी धावपळ करत होते. शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेही शेवटच्या काही मिनिटांत धावाधाव करत सभागृहात आले. तर अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्यासह अन्य काही सदस्यांना सभागृहाची दारं बंद करण्यात आल्यानं सभागृहाबाहेरच राहावं लागलं.


महाराष्ट्राच्या विधानसभेत विश्वासदर्शक ठराव संमत केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. विधानसभेत मतदान सुरु असताना महाविकास आघाडीच्या आमदारांकडून ED-ED च्या घोषणा दिल्या जात होत्या. यावर देवेंद्र फडणवीसांनी आक्षेप घेत, महाविकास आघाडीला जोरदार टोला हाणला. 


विधानसभेत बोलताना नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "हो महाराष्ट्रात ईडीच्याच मदतीन सरकार स्थापन केलंय. पण यामध्ये 'E' म्हणजे,  Eknath Shinde आणि 'D' म्हणजे, Devendra Fadnavis. 


विधानसभेत नवनिर्वाचिक एकनाथ शिंदे सरकारनं आज विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यांच्या समर्थनार्थ 164 मतं पडली. त्याचवेळी शिंदे यांच्या विरोधात 99 मतं पडली. महाराष्ट्र विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर मतदान सुरु असताना काहीसा गदारोळ झाला. शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी शिंदे सरकारच्या समर्थनार्थ मतदान केलं त्यावेळी शिवसेनेच्या आमदारांनी ईडी-ईडी अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं.  


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "हे सरकार टीकणार नाही, असं मी म्हणत होतो. कारण ही आघाडी अनैसर्गिक झाली होती. त्यावेळी मी म्हणाल होतो की, मी पुन्हा येईल. त्यानंतर लोक माझी टिंगल टवाळी करत होते. काही जणांनी माझा अपमान केला. पण मी परत आलो, पण येताना यांनाही घेऊन आलो." पुढे बोलताना ते म्हणाले की, "मी एकटा नाही आलो, मी यांना सोबत घेऊन आलो. ज्यांनी माझी टिंगलटवाळी केली, त्यांचा सर्वांचा मी बदला घेणार आहे, असंही फडणवीस म्हणाले. माझा बदला एवढाच की, मी त्यांना माफ केलं, असंही फडणवीस म्हणाले.