मुंबई : नोटाबंदीच्या वर्षपूर्तीबाबत विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून निषेधही केला जातोय. नाशिक, औरंगाबाद आणि जळगाव इथे नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त निषेध नोंदवला गेला.

जळगावात काँग्रेसने श्राद्ध घालून नोटाबंदीच्या निर्णयाला चुकीचं ठरवलं. तर  औरंगाबादेत काँग्रेसनेच मुंडन करुन नोटाबंदीचा निषेध केला. नाशिकमध्येही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी रामकुंडावर नोटाबंदीचं श्राद्ध घातलं.

मागच्या वर्षभरात अनेक व्यवसाय धोक्यात आले, केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फक्त अतिश्रीमंतानाच फायदा झाल्याचा आरोपही यावेळी केला गेला. त्यामुळे राज्यातील विविध शहरांमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून सरकारचा निषेध नोंदवला जात आहे.

पुण्यात नोटाबंदिविरोधात राष्ट्रवादीचा मोर्चा

पुण्यात नोटबंदीच्याविरोधात राष्ट्रवादीने मोर्चा काढला. विशेष म्हणजे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एकत्र येऊन सरकारचा निषेध केला. लोकमान्य टिळक पुतळा, मंडईपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.

दरम्यान पुण्यात सामाजिक संस्थांनीही आंदोलन केलं. विविध सामाजिक संघटनांनी केंद्र सरकारच्या निर्णयाच्या निषेधासाठी मानवी साखळी तयार केली आणि मोदी सरकारचा निषेध केला.

मुंबईत नोटाबंदीचं श्राद्ध

मुंबईत राष्ट्रवादीतर्फे आझाद मैदानात नोटबंदीचं वर्षश्राद्ध घालण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंड आणि सुनील तटकरे सहभागी झाले. छत्रपती शिवाजी महाराज टर्निमसवरुन राष्ट्रवादीने हा मोर्चा काढला आणि आझाद मैदानात श्राद्ध घातलं.

सोलापुरात काळा दिवस साजरा

सोलापुरातही काँग्रेसने नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त काळा दिवस साजरा आंदोलन केलं. तर भाजपने भ्रष्टाचार विरोधी दिवस म्हणून नोटाबंदीच्या समर्थनार्थ उत्सव साजरा केला. काँग्रेसकडून 8 नोव्हेंबर काळा दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे.