नागपूर: नोटाबंदी म्हणजे 'खोदा पहाड, निकली चुहिया' असून, हा देशातला सर्वात मोठा घोटाळा असल्याचा घणाघाती आरोप माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केला. ते आज नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.


इतकंच नाही तर परिस्थिती पूर्ववत होण्यास ५० दिवस नाही तर पुढचे ७ महिने जातील,असा दावाही चिदंबरम यांनी केला.

लोकांकडे नव्या नोटांचा साठा कसा सापडला याची चौकशी एसआयटीकडून व्हावी,अशी मागणीही त्यांनी केली आहे.

चिदंबरम म्हणाले, "नोटाबंदीने गरीबांचं कंबरडं मोडलं आहे. हे म्हणजे 'खोदा पहाड, निकली चुहिया' अशी परिस्थिती आहे. सरकारचा हा निर्णय मूर्खपणाचा आहे. कोणाकडेही या निर्णयासाठी चांगला शब्द नाही. अविवेकाने घेतलाला हा निर्णय आहे".

इतकंच नाही तर चिदंबरम यांनी देशभरात सापडणाऱ्या नोटांच्या पार्श्वभूमीवर एसआयटी स्थापन करुन त्याद्वारे चौकशीची मागणी केली आहे.

सरकारचा हा निर्णय फसला आहे, त्यामुळे ते सातत्याने आपलं ध्येय बदलत आहेत. "नोटाबंदीमुळे काळा पैसा नष्ट झाला नाही, त्यामुळे सरकारने आता कॅशलेस अर्थव्यवस्थेचं गाजर दाखवलं आहे" असं आरोप चिदंबरम यांनी केला.