Arvind Kejriwal Mumbai Visit:  एका बाजूला विरोधकांची भाजपविरोधात आघाडी करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार (Nitish Kumar) देशभरातील विरोधी पक्ष नेत्यांची भेट घेत असताना आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालदेखील (Arvind Kejriwal) विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. मात्र, या भेटी केंद्र सरकारने बदली संदर्भात दिल्ली सरकारचे अधिकार गोठवण्याबाबत घेतलेल्या अध्यादेशाविरोधात असल्याचे म्हटले जात आहे. राज्यसभेत भाजपला एकट पाडण्यासाठी केजरीवाल यांनी पुढाकार घेतला आहे. त्या अनुषंगाने केजरीवाल दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेणार आहेत. 


प्रामाणिक राज्य सरकारला सत्तेच्या चाव्या हातात मिळाल्या म्हणून केंद्र सरकार त्रास देत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला. दिल्लीतील सत्ताधारी राज्य सरकारला काम करून न देता सतत त्रास देण्याचा कट भाजपा आणि मोदी संचालित केंद्र सरकार रचत असल्याचा आरोप 'आप'ने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला पराभूत करण्याकरिता देशातील सर्व पक्षांनी एकत्रित यायला हवे असे आपने म्हटले आहे.  


ठाकरे, पवार यांना भेटणार


याच अनुषंगाने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल मुंबई दौऱ्यावर असून महाराष्ट्रातील नेत्यांची भेट घेणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मुंबईत दोन दिवसाच्या दौऱ्यावर येणार असून सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकारण तसेच भाजपने इतर पक्षांची केलेली कोंडी आदी मुद्यांवर ही भेट असणार आहे. अरविंद केजरीवाल बुधवार, 24  मे 2023  उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची गुरुवार, 25 मे  भेट घेणार आहेत. मातोश्री आणि सिल्वर ओकवर या भेटी होण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.


लोकशाही संपवायला निघालेल्या भाजप सरकारला लोकसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे आपने म्हटले आहे.


राज्यसभेत भाजपला एकटं पाडणार?


सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने अध्यादेश जारी करत अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत अध्यादेश काढत हे अधिकार आपल्याकडे घेतले. अध्यादेश काढल्यानंतर त्याला कायदेशीर स्वरुप देण्यासाठी याबाबतचे विधेयक संसदेत मंजूर करावे लागणार आहे. संसदेच्या आगामी अधिवेशनात याचे विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. लोकसभेत भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने लोकसभेत विधेयक मंजूर होईल. तर, दुसरीकडे राज्यसभेत भाजप आणि एनडीए अल्पमतात आहेत. भाजपच्या नेतृत्वातील एनडीएकडे 245 पैकी 110 जागा आहेत. तर, युपीए आणि अन्य विरोधकांच्या मिळून 128 जागा आहेत. तर एक अपक्ष खासदारदेखील विरोधकांसोबत आहे. तर, सात जागा रिक्त आहेत. राज्यसभेतील काही विधेयकांना मंजूर करून घेण्यासाठी बीजू जनता दल, वायएसआर काँग्रेस आदी पक्षांची भाजपला मदत होते. त्यामुळे केजरीवाल यांच्या मोहिमेला किती यश मिळणार याकडे लक्ष लागले आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: