धुळे : संरक्षण राज्यमंत्र्यांच्या धुळे जिल्ह्यातील बोरकुंड रतनपुरा या ठिकाणी 3 फेब्रुवारी रोजी गावातील पाच भारतीय जवानांचा  संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सत्कार आयोजित करण्यात आला होता. परंतु दोन्ही मंत्री या कार्यक्रमास अनुपस्थित होते. त्यामुळे सत्कार समारंभाचे आयोजक आणि ग्रामस्थांमध्ये दोन्ही मंत्र्यांविरोधात नाराजी असल्याचे पाहायला मिळाले.


दोन्ही मंत्री अनुपस्थित राहिल्यानंतर अखेर ग्रामस्थांनीच जवानांचा सत्कार केला. "आमचे सरकार कायम शेतकरी आणि जवानांच्या पाठिशी आहे, असे म्हणवणाऱ्या युतीच्या मंत्र्यांना त्यांच्याच जिल्ह्यातील जवानांच्या कार्यक्रमासाठी वेळ मिळू नये ही मोठी शोकांतिका आहे." असे मत यावेळी ग्रामस्थांनी मांडले.

दरम्यान, बोरकुंड रतनपुरा या गावाची सैनिकांचे गांव अशी ओळख आहे. त्यामुळे या गावातील पाच सैनिकांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्याचे ग्रामस्थांनी ठरवले होते. सत्कार समारंभाच्या अगोदर जवानांची तीन वेगवेगळ्या वाहनातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान गावातील महिलांनी या जवानांचे चौकाचौकात औक्षण केले. जवानांचा सत्कार होत असतांना त्यांच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते.