Deepak Kesarkar On Bhagat Singh Koshyari : वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा एकदा चर्चेत आहेत. गुजराती, राजस्थानी गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य  (Bhagat Singh Koshyari controversial statement)  करत त्यांनी वाद ओढावून घेतला. वक्तव्यानंतर पुन्हा एकदा कोश्यारी यांच्यावर सर्वच बाजूने टीका होत आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनीही यावर नाराजी व्यक्त करत टीकास्त्र सोडले. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत, आल्यानंतर ते राज्यपालांची भेट घेतील असे सांगितलं. 


दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत आपलं मत मांडलं. ते म्हणाले की, 'राज्यपालांचं वक्तव्य आज चर्चेचा विषय बनलंय. या पदावरील व्यक्तीबद्दल बोलू नये, तसा शिरस्ता आहे. मुळात यांची भाषण अधिकारी लिहितात. राज्यपालांची भाषण लिहून देणा-या विभागात सुधारणा होण्याची गरज आहे. त्यांना जे लिहून दिलं जातं ते तेच वाचतात.' मुंबईत पारसी, पंजाबी यांचंही तितकच योगदान आहे. मुंबईत फिल्मवाले आहे, मुंबईवर महालक्ष्मीचा आशिर्वाद आहे. काही लोकं फक्त लोटा घेऊन आले, ते सोबत पैसा घेऊन आले नव्हते. पैसा त्यांनी इथं आल्यावर कमवला, असे केसरकर म्हणाले. 



राज्यपालांची भाषण लिहून देणा-या विभागात सुधारणा होण्याची गरज आहे. त्यांना जे लिहून दिलं जातं ते तेच वाचतात. राज्यपालांवर केंद्र सरकारचं नियंत्रण असायला हवं. मुख्यमंत्री सध्या दौ-यावर आहेत, ते आल्यावर त्यांची भेट घेतील. राज्यपालांच्या वाक्याशी मी काय कोणीही सहमत होणार नाही. आम्ही आमच्या पक्षातर्फे पत्र पाठवून याबद्दल भूमिका जाहीर करूच, असे दीपक केसरकर म्हणाले. माजी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर मी बोलणार नाही. कुठल्याही वाक्याचं राजकारण करायचं नाही, असेही केसरकर यावेळी म्हणाले. 


राज्यपाल काय म्हणाले?
 राज्यपालांनी महाराष्ट्राचा (Maharashtra) अपमान केला आहे असं म्हणत विरोधकांसह सामान्य नागरिकांनी त्यांच्यावर सवाल उपस्थित केले आहेत.  गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वक्तव्य भगसिंह कोश्यारींनी केलं आहे.  काल मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपालांचं हे वक्तव्य म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे, त्यांना नारळ द्या अशी मागणी आता विरोधकांनी केली आहे.