सिंधुदुर्ग : स्वतःची खाजगी जागा प्राण्यांसाठी राखीव ठेवल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? नाही ना? मग आम्ही तुम्हाला अशाच एका प्राणीप्रेमी अवलियाची माहिती सांगणार आहे. ज्यांनी महाराष्ट्राचा राज्य प्राणी असलेल्या 'शेकरू'साठी स्वतःची खाजगी जागा राखीव ठेवली आहे.


व्यवसायाने मानसोपचारतज्ज्ञ असलेले डॉ. रुपेश पाटकर असे या प्राणीप्रेमीचं नाव आहे. ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा गावातील गवळीटेंब येथील आहेत. पाटकर यांनी स्वतःची लागवडीखाली असलेली खाजगी जागा महाराष्ट्राचा राज्य प्राणी असलेल्या 'शेकरू'साठी राखीव ठेवली आहे. त्याच कारणही तसंच आहे. गावातील शिकाऱ्यांपासून शेकरूच्या रक्षणासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे. शिकाऱ्यांना समज देत डॉक्टरांनी आपल्या जागेभोवती 'शेकरू राखीव क्षेत्रा'चा चक्क फलकच लावला आहे.


..म्हणून स्वतःची खाजगी जागा राखीव ठेवण्याचा निर्णय
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवर असलेलं बांदा हे छोटेसे गाव. या गावातील गवळीटेंब येथे डॉ. रुपेश पाटकर राहतात. व्यवसायाने ते मानसोपचारतज्ज्ञ आहेत. गोव्यामध्ये कार्यरत असलेले डॉ. पाटकर सकाळी गोव्याला जाऊन संध्याकाळी पुन्हा महाराष्ट्रात परतात. गवळीटेंबमध्येच त्यांची 8 एकरावर नारळाची बागायती आहे. या बागायतीमध्ये गेल्या पंधरा वर्षांपेक्षा जास्त काळ शेकरूचा अधिवास आहे. शेकरूच्या दोन ते तीन जोड्या या बागयतीमध्ये गुण्यागोविंदाने नांदतात. या आठ एकराच्या बागायतीला डॉ. पाटकरांनी आता 'शेकरू राखीव क्षेत्र' म्हणून आरक्षित केले आहे. लोक आपल्या बागेत आलेल्या शेकरूला मारतात किंवा त्याची शिकार करतात. त्यामुळे शेकरू प्राणी दुर्मिळ होत चाललाय. शेकरू मोठ्या प्रमाणात नारळाची शहाळी खातात. त्यामुळे नारळाच्या बागेत शेकरू आल्यास लोक त्याची शिकारी करतात. त्यामुळे डॉ. पाटकर यांनी पुढाकार घेऊन शेकरूसाठी स्वतःची खाजगी जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.