पंढरपूर : गेले संपूर्ण वर्ष कोरोनाच्या दहशतीखाली गेल्याने आज नववर्षाला विठुरायाचे दर्शन घेऊन सर्व संकटे दूर करण्याचे साकडे घालण्यासाठी भल्या पहाटेपासून देशभरातील हजारो भाविक पंढरपूरमध्ये आले आहेत. मंदिर प्रशासनानेही मंदिराला आकर्षक फुल सजावट करीत भाविकांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे . मात्र अनेक वृद्ध भाविकांची मंदिर समितीकडून फसवणूक होत असल्याच्या तक्रारी भाविकांनी माझाशी बोलताना व्यक्त केल्या. तर एका मुंबईच्या भाविकाला रिक्षातून प्रवास करताना खिसा कापल्याने वेगळ्याच अडचणींना सामोरे जावे लागले .

विठुरायाच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग करताना वृद्ध भाविक आणि महिलांनाही पास दिले जात आहेत. पास हातात असल्याने शेकडो किलोमीटरवरून हे भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला पोहचत असताना येथे आल्यावर मात्र त्यांना नियम दाखवून दर्शनाला सोडले जात नाही . जर आम्हाला दर्शनाला सोडायचे नसेल तर आम्हाला पास कशाला दिले असा सवाल हे भाविक करत आहे. मंदिर समितीच्या ऑनलाईन बुकिंग मधील हा यांत्रिक दोष अजूनही तसाच असल्याने रोज अनेक भाविकांना पास असूनही दर्शन मिळत नाही.

Continues below advertisement


वास्तविक कोरोनाच्या नियमानुसार 65 वर्षांपुढील भाविक , गरोदर महिला आणि 10 वर्षाच्या आतील मुलांना दर्शनाला न सोडण्याचा नियम आहे . मात्र मंदिराच्या ऑनलाईन बुकिंगमध्ये अशा भाविकांचे पासच का दिले जातात असा सवाल भाविक करीत आहेत . इतक्या लांबचा प्रवास करून आल्यावरही येथे दर्शन मिळत नसल्याने या भाविकांना आपली फसवणूक केली जात असल्याच्या भावना माझाशी बोलताना व्यक्त केल्या .


किशोर नाईक हे मुंबई येथील दादर येथून दरवर्षी पंढरपूरला येतात . दादरला त्यांचे आमंत्रण नावाचे हॉटेल असून विठुरायाने मला शून्यातून कोट्याधीश बनवले. त्यामुळे नववर्षाला मी नियमित पंढरपूरला येत असल्याचे त्यांनी सांगितले . काल रिक्षातून येताना रिक्षात बसलेल्या महिलेने त्यांचे पाकीट मारले आणि त्याची योग्य पद्धतीने दखल पोलिसांनी घेतली नाही याचे त्यांना दुःख आहे. खिशातून पाच हजार त्या महिलेने चोरले , पैसे गेल्याचे दुःख नाही मात्र ही अवस्था एखाद्या गोरगरीब भाविकांची झाली असती तर काय असा सवाल यावेळी भाविकांनी उपस्थित केला. यानंतर पंढरपूरचे DYSP विक्रम कदम यांनी त्यांची भेट घेऊन तो रिक्षा चालक आणि त्या महिलेचा शोध सुरु केला आहे


विठुरायाच्या दर्शनाला आलेल्या भाविकाचे हे अनुभव नवीन नसले तरी स्थानिक पोलिसांनी किमान याची दाखल तरी घेणे गरजेचे असते. या नवीन वर्षाच्या स्वागताला आलेल्या ऑनलाईन पासेस असणाऱ्या भाविकांनी थेट देवासमोर जाऊन सर्व संकटे घालवण्याचे साकडे विठुरायाला घातले. तर ज्यांना पासेस नव्हते अशा शेकडो भाविकांनी आजही नामदेव पायरीचे दर्शन घेत नवीन वर्षाची सुरुवात केली .


संबंधित बातम्या :