Ashadhi Wari 2022 : यंदाच्या आषाढी वारीला (Ashadhi Wari ) विक्रमी भाविक पंढरपुरात दाखल झाले होते. गेल्या दोन वर्षात कोरोनाचं संकट असल्यामुळं आषाढी वारीचा सोहळा मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला होता. मात्र, यावर्षी कोरोनाचा धोका कमी झाल्यानं मोठ्या संख्येनं वारकरी पंढरपुरात आले होते. अशातच पावसाची संततधार देखील कायम होती. पावसामुळं चंद्रभागेच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली होती. दरम्यान, यंदाच्या आषाढी यात्रेत 19 भाविकांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर 100 पेक्षा जास्त भाविकांना बुडताना वाचवण्यात आले आहे.
 
यंदा चंद्रभागा नदीत असलेल्या मुबलक पाण्यामुळं अनेक भाविक बुडाल्याच्या घटना समोर येत आहेत. 19 भाविकांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. तर 100 पेक्षा जास्त भाविकांना वाचवण्याचे काम प्रशासनानं नेमलेल्या रेस्क्यू टीमने केलं आहे. पावसाची संततधार आणि मोठी गर्दी अशा परिस्थितीत तब्बल 13 भाविकांचा पंढरपूर शहरात मृत्यू झाल्याच्या नोंदी पोलिसात दाखल झाल्या आहेत. जवळपास 12 लाखापेक्षा जास्त भाविक यावर्षी यात्रेला आले होते. काल एका दिवसात प्रशासनानं तब्बल 500 टन कचरा गोळा केला आहे.  यावेळी चंद्रभागा वाळवंटात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. स्नानासाठी वारखऱ्यांची झुंबड उडत असल्याचे चित्र होते. तसेच भक्त पुंडलिकांच्या दर्शनासाठीही रांगा लागल्या होत्या. नदीच्या पैलतिरावर साकारण्यात आलेल्या भक्तिसागरातील 65 एकरातील सर्व प्लॉट दिंड्यांना देण्यात आले होते.  


राज्यात आत्तापर्यंत पूर आणि अतिवृषष्टीमुळं 76 जणांचा मृत्यू 


देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. काही राज्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत. शेती पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे. महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूर आणि अतिवृष्टीमुळं राज्यात आत्तापर्यंत 76 जणांचा मृत्यू झाला आहे. तर गुजरामध्ये या स्थितीमुळं आत्तापर्यंत 63 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशातील गुजरात, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये हवामान विभागानं 'रेड अलर्ट' जारी केला आहे.


महत्त्वाच्या बातम्या: