पालघरमध्ये तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू
संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर | 26 Apr 2018 02:32 PM (IST)
पालघरमधल्या आगवनमध्ये तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैंवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.
पालघर : पालघरमधल्या आगवनमध्ये तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैंवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. खुशबू माच्छी आणि सुरक्षा माच्छी अशी मृत मुलींची नावं असल्याचं समजतं आहे. बुधवारी दुपारी तलावात आंघोळीला गेले असता पाय घसरल्याने त्या पाण्यात बुडाल्या. त्यावेळी स्थानिकांनी तात्काळ या दोन्ही मुलींना पाण्यातून बाहेर काढून पालघरमधील ढवळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र, तेथील डॉक्टरांनी दोन्ही मुलींना मृत घोषित केलं. मात्र, त्यानंतर येथील हॉस्पिटल प्रशासनाने पुढील कोणतीही प्रशासकीय कार्यवाही न करताच मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले. नातेवाइकांनी मृतदेह घरी नेऊन अंतिम संस्कार आटोपले. या दोघीही जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनी असल्याने सदर बाब सबंधित रुग्णालय प्रशासनाने स्थानिक पोलिस आणि यंत्रणेला कळवणं आवश्यक होतं. त्यामुळे याप्रकरणी रुग्णालयाचा हलगर्जीपणाही समोर आला आहे. दोन्ही मुलींच्या दुर्दैवी मृत्यूने माच्छी कुटुंबीयांवर अक्षरश: दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.