सोलापूर : सोलापूरच्या वाट्याचं एक थेंब ही पाणी इंदापूरला नेलं तर राजकीय संन्यास घेऊ असे वक्तव्य पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत दत्तात्रय भरणे बोलत होते. सोलापूर जिल्ह्यातील कोव्हिड परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी भरणे हे तीन दिवसाच्या दौऱ्यावर होते. दोन दिवस ग्रामीण भागाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी आज शहरातील परिस्थिती जाणून घेतली. दरम्यान सोलापुरात सध्या उजनीच्या पाणी वाटपावरुन राजकारण तापले आहे.  जलसंपदा विभागाने काढलेल्या एका आदेशाने इंदापूर तालुक्यातील 22 गावांना दिलासा मिळणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. मात्र यामुळे दुष्काळी जिल्हा समजला जाणारा सोलापूर पुन्हा होरपळून निघेल. उजनी धरणाच्या ऊर्ध्व बाजूस बिगर सिंचन पाणी वापरातून उपलब्ध होणारे सांडपाणी उजनी जलाशयातून उचलून शेटफळगढे येथे नवनी मुठा उजवा कालव्यात किमी 169 येथे सोडून खडकवासला प्रकल्पाचे सिंचन स्थिरीकरण करण्याबाबत जलसंपदा विभागाने पत्र काढले आहे. 


उजनी धरणातून 5 टीएमसी पाणी इंदापूरला जाणार असल्याचे म्हणत सर्वच पक्षातील नेत्यांनी आपल्या टीकेचा रोख बारामतीकडे केला आहे. मात्र पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विरोधकांचा हा आरोप फेटाळून लावला. सोलापूरसाठीच्या पाण्याचा एक थेंब जरी इंदापूरला नेल्याचे कोणी सिद्ध केले तर केवळ मंत्रीपद आणि आमदारकीचा राजीनामाच नाही तर राजकीय संन्यास घेईन असे वक्तव्य दत्तात्रय भरणे यांनी केले. पाण्याच्या मुद्यावरुन राजकारण केले जात आहे. कोरोनाच्या परिस्थितीत हे योग्य नाही. काम करणाऱ्या माणसाला अशा टीकेवरुन त्रास होतो. तसाच त्रास मला देखील होत आहे. स्वत:ची भूक भागवण्यासाठी दुसऱ्याच्या ताटातील भाकरी पळवणे असे संस्कार माझ्यावर नाहीत. असे वक्तव्य देखील पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापुरात केले. 


उजनीचे पाणी पुन्हा पेटणार, इंदापूरला 5 टीएमसी पाणी देण्याच्या आदेशानंतर वातावरण तापले, पालकमंत्री भरणे म्हणाले... 


सोलापुरात कोरोनाबाधितांंची संख्या वाढत असल्याने दत्तात्रय भरणे यांनी 3 दिवसाचा जिल्हा दौरा केला. मागील महिन्यात पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कोणतिही बैठक घेता येत नव्हती. त्यामुळे जवळपास दीड महिना कोणतीही बैठक घेता आली नाही. मात्र मतदान पार पडताच आचारसंहिता शिथील करण्याची मागणी करण्यात आली होती. 22 एप्रिल रोजी निवडणूक आयोगाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता शिथील केल्यानंतर तात्काळ तीन दिवसाचा दौरा केल्याचे स्पष्टीकरण दत्तात्रय भरणे यांनी यावेळी दिले. यावेळी अक्कलकोट तालुक्यात नव्याने सुरु करण्यात आलेल्या कोव्हिड हॉस्पिटलचे उद्घाटन देखील भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. 


पीपीई किट घालून रुग्णांशी संवाद


दरम्यान या पत्रकार परिषदेनंतर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेतली. पीपीई किट घालून रुग्णांशी संवाद देखील यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी साधला. यावेळी रुग्णांनी सिव्हिलमध्ये मिळत असलेल्या उपचारवरून समाधान व्यक्त केले. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात मिळत असलेल्या उपचार बाबत आणि स्वच्छतेबाबत अनेक वेळा तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यामुळे अचानक भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला. यावेळी रुग्णांनी मिळत असलेल्या सेवेबाबत समाधान व्यक्त केलं. अशी प्रतिक्रिया पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. यावेळी शासकीय रुग्णालयातील मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. प्रसाद, डॉ. चिटणीस, डॉ. अग्रवाल इत्यादी देखील सोबत होते.