यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी काही दिवसांपूर्वी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. आज (1 डिसेंबर) सकाळी मंदिरात देवीला कौल लावण्यात आला. त्यानुसार 27 जानेवारी 2018 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.
दीड दिवस चालणाऱ्या भराडी देवी जत्रोत्सवाच्या तारीख निश्चितीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचं लक्ष लागलेलं असतं. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे (रेल्वे, बस) तिकीट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी होते.
दरवर्षी गर्दीचे नवनवे उच्चांक गाठणाऱ्या यात्रोत्सवात यंदाही 10 लाखांहून अधिक भाविक हजेरी लावतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यापार्श्वभूमीवर आंगणेवाडी मंडळ, ग्रामस्थ, मसुरे ग्रामपंचायत, तसंच जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन, पोलिस, महसूल आणि अन्य विभाग यात्रेचं नियोजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.