Darshana Pawar Murder Case : MPSC टॉपर दर्शना पवार हिच्या मारेकऱ्याला जेरबंद करण्यात अखेर पुणे पोलिसांना यश आलं आहे. त्यांनी मुंबईतील अंंधेरीतून पुणे ग्रामीण पोलिसांनी राहुल हांडोरे बेड्या ठोकल्या आहे. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यासंपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु आहे. सीसीटीव्हीचा आधार घेत या प्रकरणाचा पुढचा तपास करण्यात येणार आहे. त्यातच सीसीटीव्हीत दिसत असल्याप्रमाणे सकाळी 8 वाजताच्या सुमारास दरम्यान दोघे राजगडाच्या पायथ्याची ट्रेकला निघालेले दिसत आहे. मात्र 10 वाजून 45 मिनिटांनी राहुल एकटाच परत येताना दिसत आहे. त्यामुळे त्या चार तासात नेमकं काय घडलं? हे शोधण्याचं पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे. दर्शनाने लग्नासाठी नकार दिला त्यामुळे त्याने हत्या केली असावी, असा पोलिसांना अंदाज आहे.


राहुलकडून गुन्हा केल्याची कबुली


दर्शनाच्या हत्येचा राहुल हा एकमेव प्रत्यक्षदर्शी आहे. त्यामुळे राहुल तपासादरम्यान पोलिसांना कोणती माहिती देतो? त्याने हत्या का केली? आणि त्याचं दर्शनाबरोबर कोणतं नातं होतं? किंवा किती वर्षापासून त्या दोघांची मैत्री होती?,दर्शनाच्या हत्येचा कट कसा रचला? आणि त्या चार तासांत नेमकं काय घडलं?, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समोर येणार आहे. त्यासाठी पोलीस त्याची सखोल चौकशी करणार आहे. सोबतच दर्शनाच्या घरच्यांची आणि राहुलच्या घरच्यांचीदेखील विचारपूस करण्यात येणार आहे. सध्या या सगळ्याचा तपास करण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि राहुलच्या कबुली जबाबाचा आधार घेणार आहे. त्यात राहुलने सुरुवातीला हत्या केल्याचं कबूल केलं नव्हतं मात्र आता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. तो मुंबईहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याला पोलिसांनी गाठलं आहे. 


19 जूनला दर्शनाच्या पोस्टमार्टममधून दर्शनाची हत्या झाल्याचं समोर


18 जूनला दर्शना पवार हिचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर ती राहुलसोबत ट्रेकला गेल्याचं समजल्यावर राहुलवर संशय व्यक्त केला जात होता. त्यानंतर 19 जूनला दर्शनाच्या पोस्टमार्टममधून दर्शनाची हत्या झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करायला सुरुवात झाली. हत्या केल्यानंतर राहुल पसार होता. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी वाढला. त्याच्या आई वडिलांकडे देखील चौकशी केली होती. त्यानंतर पोलिसांनी पाच पथकं नेमली. त्यांनी नाशिक, मुंबई, सिन्नर, पुणे या ठिकाणी पथकं तपासासाठी पाठवण्यात आली होती. सलग चार दिवस या प्रकरणाचा शोध सुरु होता. त्याचं लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला असता पश्चिम बंगालमध्येही त्याचं लोकेशन पोलिसांना सापडलं होतं. या दरम्यान त्याने कुटुंबियांकडूनही पैसे मागवले होते. त्यांनीदेखील टप्प्याटप्प्याने पैसे पाठवले होते. पोलिसांना राहुलचा तपास करण्यासाठी राहुलच्या कुटुंबियांनीदेखील सहकार्य केलं होतं.