रत्नागिरी: दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंड झाल्याचं दिसून आलं आहे. आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ. ममता मोरे यांच्या विरोधात प्रभाग क्रमांक 10 मधून शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या शिवानी खानविलकर यांनी अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्यावर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीला निवडणुकीनंतर अवघ्या 15 दिवसांत झटका दिला असून या त्यांच्या कृतीमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी आघाडीत खळबळ उडाली आहे.


दापोली नगरपंचायत निवडणुकीसाठी वरिष्ठ पातळीवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात आघाडी करण्यात आली. त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांच्या संयुक्त बैठकीनंतर या नगरपंचायत निवडणुकीची शिवसेनेची सूत्रे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडे सूपूर्द करण्यात आली तर विद्यमान आमदार योगेश कदम यांना या प्रक्रियेपासून बाहेर ठेवण्यात आले. 


योगेश कदम समर्थकांनी अपक्ष म्हणून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. तर पदाधिकारी पक्षाच्या प्रवाहात सामील न झाल्याने पालकमंत्र्यांनी थेट पदाधिकारी बदलून सर्वांनाच इशारा दिला. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी आघाडीने विरोधकांना भुईसपाट करत 14 जागा जिंकल्या. त्यामध्ये शिवसेनेच्या 6 तर राष्ट्रवादीच्या 8 जागांचा समावेश होता.


यानंतर नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर शिवसेनेमध्ये नौशीन गिलगिले, ममता मोरे व शिवानी खानविलकर हे दावेदार होते. त्यामध्ये ममता मोरे यांचे नाव वरिष्ठ पातळीकरुन निश्चित करण्यात आले. त्याप्रमाणे शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी, राष्ट्रवादीचे माजी आमदार संजयराव कदम, किशोर देसाई, अजय बिरवटकर, संदीप राजपुरे, खालिद रखंगे, नरेंद्र करमरकर, जगदिश केळसकर, गोपाल गवळी, यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ममता मोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.


हा उमेदवारी अर्ज दाखल होण्यापूर्वाच शिवसेनेच्याच नगरसेविका शिवानी खानविलकर यांनी अपक्ष नगरसेविका सौ.कृपा घाग व सौ.प्रिती शिर्के यांच्या पाठिंब्यावर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अपक्ष नगरसेविका सौ.कृपा घाग व सौ.प्रिती शिर्के या शिवसेना आघाडीतून विजयी झाल्या असून ही आघाडी कदम समर्थकांनी उभी केली होती. त्यांच्या पाठिंब्यावर शिवानी खानविलकर यांनी अर्ज दाखल केल्याने दापोलीत सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून शिवानी खानविलकर यांनी अपक्ष नगरसेवकांचा पाठिंबा घेतल्याने शिवसेनेत खळबळ उडाली आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha