नाशिकः रिपब्लिकन पक्षाकडून 19 ऑक्टोबर रोजी शिर्डीत आयोजित करण्यात आलेली दलित मराठा ऐक्य परिषद रद्द करण्यात आली आहे. या परिषदेची पुढील तारीख नंतर कळवण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा रिपाइचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.


नाशिकच्या हिंसक आंदोलनानंतर रामदास आठवले यांनी आज नाशिक जिल्ह्याचा दौरा करून दोन्ही समाजाला शांतता आणि संयम राखण्याचं आवाहन केलं.

पोलिस आणि प्रशासनाची बैठक घेऊन कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन आठवलेंनी केलं. नाशिकच्या आंदोलनात जखमी झालेल्या पीडितांची नाशिक सिव्हिल हॉस्पिटल येथे भेट घेऊन आठवलेंनी चौकशी केली.


तळेगावच्या पीडित मुलीच्या कुटुंबियांचीही रामदास आठवलेंनी भेट घेतली. नाशिकमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर आठवलेंनी शिर्डीची दलित-मराठा ऐक्य परिषद पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती दिली.