Mumbai Police : कोरोना संकटामुळं यंदा तब्बल दोन वर्षांनी दहीहंडी साजरी होणार आहे.  मात्र दहीहंडीच्या एक दिवस अगोदर रायगडमध्ये संशयास्पद बोट आढळल्याने राज्यभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.  मुंबईमध्ये देखील कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी सुरक्षेची सर्वोतोपरी काळजी घेतली आहे. 


सध्या शहरात  कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सूचना दिल्या आहेत. 



  • पोलीस स्थानकाच्या हद्दीतील महत्वाच्या ठिकाणी पुढील आदेशापर्यंत  नाकाबंदीचे आयोजन करण्यात येणार आहे. नाकाबंदीकरीता कमीत कमी 10 पोलीस अंमलदारांसह एका पोलीस उप निरीक्षक दर्जाच्या अधिकारी यांची नेमणूक करावी. नाकाबंदीच्या ठिकाणी आवश्यक संख्येमध्ये शस्त्र, दारुगोळा, बुलेटप्रुफ जॅकेट यांचा वापर करण्यात येणार आहे.

  • पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये परिणामकारक कोंबिंग ऑपरेशनचे आयोजन करून अभिलेखावरील पाहिजे व फरारी आरोपी तसेच अभिलेखावरील हिस्ट्री शीटर गुन्हेगारांची तपासणी करावी. 

  • गुन्हे प्रकटीकरण अधिकारी, तडीपार कक्ष अधिकारी यांनीही आपल्या पथकासमवेत पोलीस ठाण्याच्या हदीमध्ये सतर्क व परिणामकारक गस्त करून कारवाई करण्यात येणार आहे. दहशतवाद विरोधी पथकाचे अधिकारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व हॉटेल, लॉज, धर्मशाळा  तसेच महत्वाच्या आस्थापना व संवेदनशील ठिकाणांची कसून तपासणी करावी 

  • तसेच आवश्यकतेप्रमाणे घातपात विरोधी तपासणी करून घ्यावी. मुंबईमध्ये सागरी कवच अभियान राबविण्यात यावे. याकरीता जास्तीत जास्त मनुष्यबळ आणि आवश्यक त्या साधन सामग्रीचा वापर करावा.  सागरी गस्तीमध्ये वाढ करावी.

  • पोलीस ठाणे हद्दीतील मिश्र लोकवस्ती, गर्दीची ठिकाणे, संवेदनशील ठिकाणांची तपासणी करावी.

  • महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणी पुढील आदेशापर्यंत जास्तीत जास्त पोलीस कर्मचारी तैनात करावे तसेच पंचतारांकित हॉटेल्सच्या सुरक्षेचा आढावा घ्यावा 

  • सशस्त्र पोलीस दलातील शस्त्रागार विभाग यांनी त्यांचेकडील सर्व शस्त्र, दारूगोळा, बुलेटप्रूफ जॅकेटस्, गॅसगन, गॅस ग्रेनेड, रबर बुलेट व गन, आरआयव्ही आदी  सुस्थितीत ठेवावे 


दहीहंडीला खेळाचा दर्जा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा 


गोकुळ अष्टमीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गोविंदासाठी महत्त्वाची घोषणा राज्य सरकारकडून आज विधानसभेत करण्यात आली. दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. राज्य सरकारच्या खेळाडूंना दिलेल्या नोकऱ्यांमधील पाच टक्के आरक्षणाचा लाभ आता गोविंदांनाही मिळणार आहे. दहीहंडी उत्सवातील गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामध्ये मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर गंभीर जखमी झालेल्यांना 7.50 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. हात-पाय जायबंदी झालेल्यांना 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली