डहाणू : चिमुरड्यांना अनेकदा शाळेला दांडी मारावीशी वाटते. मग पोटदुखी किंवा तब्येत बिघडल्याची कारणं देत शाळेत जाण्याचा कंटाळा करतात, तर काहीजण अभ्यासात गोडी नसते, गुरुजी-बाईंचा धाक, अपूर्ण गृहपाठ अशीही कारणं देत विद्यार्थी गैरहजर राहण्याचा प्रयत्न करतात. मात्र, या सर्व गोष्टींना बाजूला सारत डहाणूच्या ययाती गावड या विद्यार्थिनीने अनोखा विक्रम नोंदवला आहे.

ययातीने गेल्या पाच वर्षात शाळेला एकही दिवस दांडी न मारता शंभर टक्के हजेरी लावली आहे. तिने हा राष्ट्रीय विक्रम करुन, महाराष्ट्रात तसेच ग्रामीण विभागात पहिली येण्याचा मान मिळवला आहे. ययाती देशात दुसरी आली असून, तिने या यशाचं रहस्य नियमीत व्यायाम, योगा आणि घरच्या आहाराला दिले आहे.

डहाणूतील चिखले गावातील दहा वर्षीय ययाती शैलेंद्र गावड या विद्यार्थिनीने शंभर टक्के उपस्थिती दर्शवत अनोख्या राष्ट्रीय विक्रमाला गवसणी घातली आहे. ती दुसरी ते सहावी या वर्गात शिक्षण घेत असताना एकही दिवस गैरहजर राहिली नाही. तिच्या यशाची नोंद इंडियन वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये करण्याच प्रयत्नही सुरू असून, ती राष्ट्रीय पातळीवर ग्रामीण विभागात प्रथम तसेच शहरी आणि ग्रामीण संयुक्त विभागात देशात दुसरी आली आहे.

ययातीने 2012-13 ते 2016-17 या शैक्षणिक वर्षांत सतत पाच वर्षे शंभर टक्के उपस्थित राहून हजेरीचा अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

2012-13 ते 2014-15 या तीन वर्षांत डहाणू पारनाका येथील न्यू एज्युकेशन ट्रस्ट प्राथमिक शाळा येथे दररोज 16 किलोमीटरचा प्रवास खासगी वाहनाने करून तिने एकही सुट्टी न घेता शिक्षण घेतले. तसेच 2015-16 ते 2016-17 या दोन वर्षांत बोर्डी येथील एस.पी.एच.हायस्कूल येथे रोजचा 16 किलोमीटरचा एसटीने प्रवास करून, तिने हा पराक्रम केला.

अभ्यासाबरोबरच खेळ आणि वक्तृत्व स्पर्धांमध्येही अव्वल असणारी ययाती शाळेत, गावात, मित्र-मैत्रिणी व कुटुंबामध्ये सर्वांची लाडकी आहे. तिच्या या कर्तृत्वाने डहाणू तालुक्याचे व पर्यायाने राज्याचं नाव ही उंचावलं आहे. या विक्रमाबद्दल तिचे सर्व स्तरातून सध्या कौतुक होत आहे.

ययातीच्या या यशाच रहस्य तिचा नियमित व्यायाम, योगा आणि घरचा आहार हे आहे. यामुळेच ती नेहमी फिट राहते. बाहेरचं अन्न खाण्यापेक्षा घरातलं जेवणं खा, असंही ययतीने तिच्या मित्र-मैत्रिणींना आवाहन केलं आहे.