Cyclone Biporjoy : बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्रगतित अडथळा निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अरबी समुद्रात बिपरजॉय नावाचे चक्रीवादळ आज रात्री निर्माण होत आहे. त्यामुळे मॉन्सूनच्या प्रगतीत आणखी अडथळा येण्याची शक्यता आहे. मान्सून केरळात कधीही दाखल होऊ शकतो , मात्र तिथून पुढे त्याची प्रगती चक्रीवादळामुळे आणखी अडखळू शकते.


16 जूननंतरच महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. 9 तारखेपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो, पण त्यानंतर त्याचा पुढील प्रवासात चक्रीवादळामुळे अडथळा निर्माण होऊ शकतो. केरळमध्येच मान्सून काही दिवस मुक्कामी राहण्याची शक्यता आहे. 


मुंबईसह कोकणात पावसाची शक्यता -
बिपरजॉय चक्रीवादळाचा आत्ताचा मार्ग समुद्र किनारपट्टीपासून समुद्रात आतमध्ये एक हजार किलोमीटर इतका आहे. भारताच्या किनारपट्टीपासून एक हजार किलोमीटर अंतरावरून ते पुढे जाण्याची शक्यता आहे. मात्र ते उजवीकडे वळाले तर कोकण , मुंबई यासह किनारी भागात ११ , १२ आणि १३ जूनला मोठा पाऊस पडू शकतो. मात्र हे चक्रीवादळ डावीकडे वळाल्यास मॉन्सून आणखी लांबू शकतो . 


मंगळवारी केरळजवळच्या समुद्रात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. ही प्रणाली गोव्यापासून 950 किलोमीटर नैर्ऋत्येकडे, मुंबईपासून 1100 किलोमीटर दक्षिणेकडे तर गुजरातच्या पोरबंदरपासून, ११९० किलोमीटर दक्षिणेकडे होती. उत्तरेकडे सरकत असलेली ही प्रणाली आणखी तीव्र होत असून, आज पूर्व-मध्य अरबी समुद्रात चक्रीवादळ घोंघावण्याचे संकेत आहेत.






यावर्षी आधी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या  मोचा चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या मॉन्सूनवर परिणाम झाला आणि मॉन्सून लांबला तर आता अरबी समुद्रातील बिपॉर्जोय चक्रीवादळामुळे आरबी समुद्रातील मॉन्सूनच्या शाखेवर देखील परिणाम होताना दिसतोय.  1972 ला मॉन्सून केरळात 18 जूनला तर मुंबईत 25 जूनला दाखल झाला होता, ते वर्ष भीषण दुष्काळाचं ठरलं होतं.  


मच्छीमारांनी सावधगिरीचा इशारा
तसेच, हवामान विभागाने म्हटलं की, पुढील 48 तासांत चक्रीवादळ जवळपास उत्तरेकडे सरकण्याची आणि आग्नेय आणि लगतच्या पूर्वमध्य अरबी समुद्रावरील दबाव क्षेत्र तीव्र होण्याची शक्यता आहे. खोल समुद्रात मासेमारीसाठी समुद्रात जाताना मच्छीमारांनी सावध राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील पाच दिवस मासेमारीसाठी समुद्रात जाताना मच्छीमारांनी सावध राहण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.






9 जूनपर्यंत केरळात मान्सून दाखल होणार


पुढील 24 तासात अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात तयार होणार  आहे. पुढील  48 तासात कमी दाबाच्या क्षेत्राचे डिप्रेशनमध्ये रुपांतर होण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज  आहे. या सिस्टीमचा मान्सूनवर प्रभाव पडणार असून यावर भारतीय हवामान विभाग लक्ष ठेवून असल्याची माहिती आहे. 9 जूनपर्यंत केरळात मान्सून दाखल होण्याचा स्कायमेटचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस महत्त्वाचे आहे.  राज्यासह देशात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात बहुतेक जिल्ह्यांमध्ये मान्सून पूर्व पावसाची हजेरी लावली आहे.