औरंगाबाद : अलिकडच्या काळात बाजारात जाण्याऐवजी ऑनलाईन खरेदीकडे नागरिकांचा कल दिसत आहे. मात्र ऑनलाईन खरेदीमध्येही फसवणुकीचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. औरंगाबादेत एका ग्राहकाने 'फ्लिपकार्ट' या ऑनलाईन शॉपिंग साईटवरुन मोबाईल मागवला. मात्र प्रत्यक्षात त्याला वीट मिळाली.


औरंगाबादच्या मयूर पार्कमध्ये राहणाऱ्या गजानन खरात या ग्राहकाने फ्लिपकार्टवरून मोबाईल ऑर्डर केला होता. मात्र त्याला मोबाईल ऐवजी वीट मिळाल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे गजानन यांना नऊ हजारांना ही वीट पडली आहे.


गजानन यांनी 9 तारखेला फ्लिपकार्टवरून मोबाईल मागवला होता, त्यांना तो कुरिअरने 14 तारखेला मिळाला. मात्र कुरिअर ओपन केलं त्यावेळी  त्यात वीट, प्लास्टिकच्या पिशव्या मिळाल्या. मात्र आपली फसवणूक झाल्याचं पाहून गजानन यांच्या पायाखालची वाळू सरकली.


संपूर्ण प्रकारानंतर फ्लिपकार्ट कंपनीला फोन केल्यानंतर गजानन यांना समाधानकारक उत्तर मिळालं नाही. त्यामुळे गजानन यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि आपली फसवणूक झाल्याची तक्रार दिली.


औरंगाबाद शहरातील हरसूल पोलीस ठाण्यात फ्लिपकार्ड आणि कुरिअर कंपनी विरोधात गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे.