दसरा जवळ आला की राज्यात दोन मेळाव्यांची चर्चा होते. एक म्हणजे शिवसेनेचा शिवतीर्थावरील दसरा मेळावा आणि दुसरा पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भगवान गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याची परंपरा गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी खंडित केल्यानंतर पंकजा मुंडे यांनी सावरगावमध्ये दसरा मेळावा भरवून शक्तीप्रदर्शन केलं. यावर्षी तर पंकजा मुंडे भगवान बाबांच्या भव्य स्मारकाचं लोकार्पण करणार आहेत.
भगवान बाबांची 25 फुटांची मूर्ती पाण्यावर तरंगताना साकारण्यात येत आहे. ही मूर्ती बनवण्याचं काम प्रख्यात शिल्पकार प्रमोद कांबळे हे करत आहेत. विशेष म्हणजे संपूर्ण मूर्ती उच्च दर्जाच्या पॉलिस्टरमध्ये तयार करण्यात आली असून सध्या या मूर्तीचं काम हे अंतिम टप्प्यात आहे. येत्या 17 तारखेला ही मूर्ती सावरगाव येथे नेण्यात येणार आहे. 18 तारखेला म्हणजे दसरा मेळाव्यात या मूर्तीचं लोकार्पण होईल.
मोठ्या आरोप-प्रत्यारोपानंतर भगवान गडावरील दसरा मेळाव्याची जुनी परंपरा खंडित करण्यात आली. पंकजा मुंडेंनी भगवान बाबांच्या जन्मगावातून एका नव्या परंपरेची सुरुवात केली. पंकजा मुंडेंनी गेल्या वर्षीच सावरगावात भव्य स्मारक बांधणार असं जाहीर केलं होतं. ही सर्व तयारी आता अंतिम टप्प्यात आल्यानंतर पंकजा मुंडेंनी फेसबुक पोस्टमधून आपल्या भावना व्यक्त केल्यात. कुणाचंही नाव न घेता त्यांनी या पोस्टमधून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.
काय आहे पंकजा मुंडेंची फेसबुक पोस्ट?
“माझ्या भगवान बाबांच्या दर्शनाने व मुंडे साहेबांच्या भाषणातून इतकी ऊर्जा घेऊन जात होते लोक ती ऊर्जा त्यांच्याकडून हिरावून घेणे अशक्यच...ही अशक्य बाब हिरावून घेण्याचा प्रयत्न झालाच..हे उध्वस्त करण्याचा डाव ही आखला गेला पण कोणी आपल्यावर वार केला तर त्यांच्यावर प्रतिवार करण्यात माझी सर्व शक्ती मी का लावू? त्यापेक्षा मी नवा डाव मांडून माझ्या लोकांना सुरक्षित व शांत ठेवणे मला क्रमप्राप्त वाटले. आपले शब्द दूषित करून कोणावर टीकाटिप्पणी करण्यापेक्षा निर्मितीवर मी जोर देते आणि त्या दिशेने मी वाटचाल ठरवली..” अशा आशयाची मोठी पोस्ट लिहून पंकजा मुंडेंनी सावरगाव दसरा मेळाव्या अगोदर समर्थकांशी संवाद साधलाय.
याच मेळाव्यात दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने ऊसतोड कामगारांच्या महामंडळाची घोषणाही करण्यात येणार आहे. राज्यात एकीकडे ऊसतोड कामगारांचा संप चालू असतानाच दसरा मेळाव्याच्या निमित्ताने ऊसतोड कामगारांना एकत्रित करून पंकजा मुंडे मोठं शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत.