पंढरपूर : कार्तिकी यात्रा काळातही आषाढी प्रमाणे संचारबंदी लागू होणार असून 4 दिवस एसटी बससेवा देखील बंद राहणार असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले. कोरोनाचा धोका पुन्हा वाढू लागल्याने प्रशासन गंभीर बनले आहे. कार्तिकी काळात पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.


पंढपूरमध्ये 22 नोव्हेंबर रात्री बारा वाजेपासून 26 नोव्हेंबर रात्री बारा वाजेपर्यंत पंढरपूरकडे येणारी एसटी बसेसची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. कार्तिकी एकादशीचा सोहळा 26 नोव्हेंबर रोजी होत असताना दशमीच्या रात्री बारा वाजेपासून म्हणजेच 25 नोव्हेंबरपासून एकादशीच्या रात्री बारा वाजेपर्यंत म्हणजेच 26 नोव्हेंबरपर्यंत पंढरपूर शहरासह परिसरातील 5 ते 10 किलोमीटरपर्यंत संचारबंदी लागू केली जाणार असल्याचेही झेंडे यांनी सांगितले.


कार्तिकी यात्रा प्रतिकात्मक साजरी करण्याचा सोलापूर प्रशासनाचा प्रस्ताव; काही वारकरी संघटनांचा विरोध


जे भाविक अथवा दिंड्या पंढरपूरच्या वाटेकडे निघाले आहेत त्यांनी परत जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. अन्यथा सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरूनच या दिंड्या व भाविकांना परत पाठविण्यात येणार असल्याचे झेंडे यांनी सांगितले. कार्तिकी यात्रा काळात कोणत्याही भाविकांनी मंदिरापर्यंत अथवा चंद्रभागेपर्यंत पोहचू नये यासाठी मंदिर व चंद्रभागा परिसराला तिहेरी बॅरेंगेटिंग केले जाणार आहे. दरम्यान आज प्रशासनाने वारकरी संप्रदायांच्या प्रतिनिधीं सोबत चर्चा केली. वारकरी संप्रदाय मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत यात्रा करू देण्याची मागणी करीत असला तरी कोरोनाचा वाढत धोका पाहून शासन व प्रशासन यास तयार होईल अशी परिस्थिती नाही. यात्रा काळात पंढरपुरात असणाऱ्या काही मोजक्या महाराज मंडळींना कोरोनाचे नियम पाळून चंद्रभागा स्नान व नगर प्रदक्षिणेला काही सवलत देता येईल का यावर सध्या प्रशासन विचार करीत आहे.